नवी दिल्ली : पुण्यातील लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि कार्गो पायाभूत सुविधांची उभारणी तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना करताना त्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकारने प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
खासदार बापट यांना आज नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी पुण्यात कार्गो सुविधा देण्यासाठी विमानतळावर संरक्षण खात्याने अडीच एकर जागा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारही मानले असून, या जागेमुळे पुणे विमानतळाचे विस्तारीकरण शक्य होत असल्याचे म्हटले आहे.
संरक्षण खात्याने जमीन देताना घातलेल्या अटी आणि शर्तींकडे बापट यांनी शिंदे यांचे लक्ष वेधले आहे. याप्रश्नी संरक्षण खाते आणि विमानतळ प्राधिकरण यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढावा. गेल्या काही वर्षांत श्रीनगर, लेह, जम्मू, पठणकोट, भटिंडा, आग्रा, बिकानेर, चंडिगड, ग्वाल्हेर, जैसलमेर, जोधपूर भूज, गोवा, जामनगर येथील विमानतळांचे विस्तारीकरण सरकारने केले. त्याप्रमाणे लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण देखील लवकर पूर्ण होण्याचा दृष्टीने लक्ष द्यावे, अशी सूचना बापट यांनी केली.
विमानतळ प्राधिकरणाने अमृतसर, नागपूर, पोरबंदर, बडोदा, बेळगावी, चेन्नई, गुवाहाटी आदी विमानतळांवर कार्गो सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पुणे आणि परिसरातील उद्योग-व्यवसायाची गरज लक्षात लोहगाव विमानतळावरही कार्गो पायाभूत सुविधेची गरज आहे. पुण्यातील विमानतळ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे विमानतळ आहे. ते जवळच्या दहा जिल्ह्यांना उपयुक्त ठरत आहे. तसेच कोरोना प्रतिबंध लसीच्या वाहतुकीसाठी हे विमानतळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याच्या विस्तारासाठी गेली तीन वर्षे मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे या प्रश्नी आपण व्यक्तिगत लक्ष घातल्यास विमानतळाचा विस्तार आणि कार्गो पायाभूत सुविधांच्या उभारणीत अडचण येणार नाही आणि नियोजित वेळेतही हे काम पूर्ण होईल, अशी विनंती बापट यांनी शिंदे यांना केली आहे.
विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना माफक दरात सेवा देणाऱ्या रिक्षा संघटनेच्या सेवा परवान्याची मुदत संपली आहे, हेही बापट यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. विमानतळावर प्रवासी वाहतुकीचा हा परवाना संघटनेला पुन्हा द्यावा. यामुळे प्रवाशांच्या सोयीबरोबरच रिक्षा चालकांचा रोजगार पुन्हा सुरू होईल, अशी मागणी बापट यांनी शिंदे यांच्याकडे केली आहे.

