पुणे दि. १३- देशभरात १४ ऑगस्ट रोजी ‘फाळणी दु:खद स्मृती दिन’ (विभाजन की विभिषिका स्मृती दिन) पाळण्यात येत असून या दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातही विविध ठिकाणी फाळणीबाधित लोकांशी संबंधित दु:खद घटना आणि अनुभवाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यानिमित्ताने आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांचा दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.
पुणे महानगरपालिकेतर्फे रवी वर्मा गॅलरी आणि फिनिक्स मॉल येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला विविध शाळेच्या विद्यार्थ्यांह नागरिक भेट देत आहेत. कात्रज येथील कै.य.ग. शिंदे विद्यानिकेतन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रामकृष्ण मोरे सभागृह, मुख्य पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन आदी विविध ठिकाणी हे प्रदर्शन होत आहे. महाराष्ट्र बँकेच्या शहरातील ६ शाखांमध्ये ११ ऑगस्टपासून हे प्रदर्शन सुरू असून ग्रामीण भागातील तालुका मुख्यालयी असलेल्या शाखेत १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
प्रदर्शनात फाळणीबाधित लोकांशी संबंधित दु:खद घटना आणि अनुभवावर आधारीत छायाचित्रांच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट्सने हे प्रदर्शन डिजीटल स्वरुपात तयार केले आहे. डिजीटल स्वरुपात ते शाळा-महाविद्यालयातून दाखविण्यासाठी उपलब्ध असेल.
प्रदर्शन अधिकाधिक नागरिकांच्या पर्यंत पोहोचेल अशारितीने आयोजन करण्यात यावे. प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी स्वातंत्र्य सैनिक, वरिष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी यांना विनंती करावी. प्रदर्शनादरम्यान राष्ट्रभक्तीपर गीते लावावी. समाजातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना डॉ.देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.