पुणे, दि. 24 मे 2021: शहरातील सहकारनगर दोनमध्ये पाण्याच्या पाईपलाईनसाठी सुरु असलेल्या खोदकामात महावितरणच्या वीजयंत्रणेला तडाखे बसत आहे. गेल्या 18 तासांमध्ये दोनवेळा सहकारनगर दोनमध्ये दीड ते दोन तासांच्या खंडित वीजपुरवठ्याचा वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
याबाबत माहिती अशी की, पर्वती विभाग अंतर्गत दत्तवाडी उपकेंद्रातून अरण्येश्वर 22 केव्ही उच्चदाब वीजवाहिनीद्वारे सहकारनगर एक व दोन, तुळशीबागवाले कॉलनी, माडीवाले कॉलनी आदी परिसरातील सुमारे 11 हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या भूमिगत वीजवाहिनीच्या लगतच पाण्याच्या पाईपलाईनसाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरु आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत संबंधीत कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि. 23) सायंकाळी 5 वाजता केलेल्या खोदकामात गणेश मंदिरजवळ ही भूमिगत वाहिनी तोडली. त्यामुळे सुमारे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून तातडीने पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली व तोडलेल्या वाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.
या घटनेनंतर सोमवारी (दि. 24) सकाळी 11 च्या सुमारास स्वानंद चौकात जेसीबीने मोठे झाड तोडण्यात आले. मात्र योग्य खबरदारी न घेतल्याने हे झाड महावितरणच्या सहा पोल स्ट्रक्चरवर पडले आणि 6 रोहित्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे सहकारनगर दोनमधील सुमारे 1500 ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित राहिला. खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्यामुळे दुरुस्तीचा आर्थिक भार, वीजविक्रीचे नुकसान व ग्राहकांचा नाहक रोष महावितरणला सहन करावा लागला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच सध्या कोरोनाच्या संचारबंदीमुळे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरु आहेत. मात्र या प्रकारांमुळे त्यांच्यासह इतर वीजग्राहकांना देखील खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

