दहावी, बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षांचे शुल्क महापालिका भरणार
पुणे-पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागांच्या शाळांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील ४४ माध्यमिक शाळांमधून चार हजार ३९२ विद्यार्थी या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यांचे प्रती विद्यार्थी ४१५ रुपये आणि तंत्रशाळेतील २०० विद्यार्थ्यांचे प्रती ५२५ रुपये परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
रासने पुढे म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील ४४९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. वाणिज्य शाखा ४३० रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रती ४९० रुपये परीक्षा शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कात्रज-आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या सुटणार
कात्रज येथील संतोषनगर आणि आंबेगावातील पोतदार शाळेसमोर जलवाहिनी क्रॉसिंग करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे परवाना शुल्क आणि अनामत रक्कम म्हणून तेरा लाख तीस हजार रुपये हस्तांतरित करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या निर्णयामुळे कात्रज-आंबेगाव परिसरातील पाण्याच्या चार टाक्या भरणार आहेत. त्यामुळे कात्रज, आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.
आरोग्य विभागातील १९९ कर्मचार्यांना मुदत वाढ
कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेची तयारी आणि लसीकरणासाठी आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणार्या कर्मचार्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, फीजिशियन, अतिदक्षता विभाग फीजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक अशा १९९ कर्मचार्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे. या आधी २११ कर्मचार्यांना मुदत वाढ देण्यात आली होती.
रासने पुढे म्हणाले, आरोग्य विभागात वर्ग एक ते चारच्या ११७८ पदांना मान्यता आहे. परंतु सध्या ८२३ कर्मचारी कार्यरत असून ८५५ पदे रिक्त आहेत. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही पदे भरता येतील.
प्राणी संग्रहालयातील कर्मचार्यांना सहा महिने मुदतवाढ
महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांना स्थायी समितीने सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही पदे कायमस्वरुपी भरायची आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर पद भरतीची कार्यवाही होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
–

