अनाथ व वंचित घटकातील मुलांच्या उपस्थितीत वाचली संविधानाचे प्रास्ताविक.
अहमदनगर (मेहन्दुरी, अकोले) येथील अक्षया आरोटे सोबत केला विवाह.
भारताचा शिखरवीर व विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे याने एक आगळावेगळा आदर्श देत २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी आपला विवाह संविधानाची प्रस्तावना वाचून केला. अहमदनगर येथील अक्षया आरोटे हिच्यासोबत रजिस्टर मेरेज करून कोणत्याही विधीशिवाय संविधानाची प्रस्तावना वाचून आगळावेगळा विवाह केला. अनाथ व वंचित घटकातील मुलांच्या उपस्थितीत सोलापूरमधील “संस्कार संजीवनी फाउंडेशन, मुळेगाव” येथे हा सोहळा पार पडला.
आपल्या वर्ल्ड पीस सेव्हन समिट मोहिमेद्वारे ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे सामाजिक बांधिलकी जपत आनंदने आधीच सर्वव्यापी विचारांचा आदर्श जगापुढे ठेवला होता. आपले लग्नही अश्या पद्धतीने करून एक वेगळा मार्ग आजच्या तरुण पिढीला दिला आहे.
गेल्या काही वर्षापासून आनंद लग्न कधी करतो याची उत्सुकता सोलापूरकराना लागून राहिली होती. आनंदने आपली मैत्रीण अक्षया आरोटे सोबत वेगळ्या प्रकारे लग्न करून सर्वाना आश्यर्याचा धक्का दिला. अक्षया आरोटे भौतिकशास्त्र या विषयात एम. एस्सी. झाली असून एक खेळाडू आहे, विविध विषयावर लेखन करण्याचा हातखंडा असून लवकरच तिचे पुस्तक येणार आहे.
या प्रसंगी आनंद बनसोडे म्हणाला, “आपल्यामधील सर्व भेद विसरून “भारतीय धर्माचे” पालन आपण केले पाहिजे. या विचाराना धरून भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून सहजीवनाची सुरवात करताना अतिशय आनंद होतो आहे. अनाथ व वंचित घटकातील मुलांसोबत हा आनंद वाटून खूप समाधान वाटत आहे.”
“एव्हरेस्टसारख्या सर्वोच्च विचारांचे असणारे आनंद यांची सामाजिक जोड व सर्वव्यापी विचारांवर प्रभावित होवून आम्ही असा विवाह करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही मुलीचे स्वप्न असते कि तिचा विवाह खूप मोठा झाला पाहिजे, पण अश्या पद्धतीने अनाथ व वंचित घटकातील मुलांच्या उपस्थितीत लग्न करून सर्वात जास्त समाधान वाटत आहे. जगातील सर्वोच्च शिखरे सर करणारे विश्वव्यापी दृष्टीकोन असणारे आनंद यांच्या विचाराना समजून घेण्यासाठी त्यापेक्षा जास्त मोठा दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, याचा अनुभव याद्वारे आला” असे अक्षया आरोटे हिने सांगितले.



