पुण्यातील दोन लहान मुलांनी गेल्या ३ नोव्हेंबरला आपल्या कामगिरीने इतिहास घडवला आहे. अद्वैत आदित्य भारतीय (वय ६) आणि वीरप्रताप राजे भोसले (वय ११) हे दोघे नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी महाराष्ट्रातील सर्वांत छोटी मुले ठरले आहेत. त्यातही अद्वैत हा अशी कामगिरी करणारा सर्वांत छोटा भारतीय ठरला आहे. ही मोहीम यशस्वी पूर्ण करुन ते गेल्या ६ नोव्हेंबरला पुण्यात परतले.
हे बालवीर पुणेस्थित साहस व पदभ्रमण कंपनी ‘ॲडव्हेंचर पल्स’सोबत या मोहिमेवर रवाना झाले होते. अद्वैतसमवेत त्याची आई पायल आदित्य भारतीय व वीरप्रतापसोबत त्याची आई दमयंती राजे भोसले याही होत्या. या संघाने २६ ऑक्टोबरला नेपाळमध्ये काठमांडूतून प्रस्थान केले. खुंबू व्हॅलीतून वाट कापत अखेरीस ते खुंबू हिमप्रपाताजवळ समुद्रसपाटीपासून १७,५९३ फूट उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोचले.
या मुलांनी इतक्या लहान वयात प्रचंड सहनशीलता आणि थक्क करणारी परिपक्वता दाखवल्याने त्यांना या प्रवासातील विविध अडचणींवर मात करणे शक्य झाले, या शब्दांत कौतुक करुन मोहिमेचे नेते व ‘ॲडव्हेंचर पल्स’चे सह-संस्थापक समीर पाथम म्हणाले, की ही पदभ्रमण मोहीम यशस्वी पूर्ण करणारी ही महाराष्ट्रातील सर्वांत छोटी मुले ठरली आहेतच, परंतु त्यातही अद्वैत भारतीय हा हिवाळी हंगामात एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारा सर्वांत लहान भारतीय मुलगा ठरला आहे.
ही १२ दिवसांची परीक्षा घेणारी पदभ्रमण मोहीम ८९०० फुटांवरील एव्हरेस्ट व्हॅलीच्या तळाशी असलेल्या लुक्ला या छोट्याशा गावापासून सुरु झाली. दूध खोसी नदीच्या काठाने रम्य अशा पाईन वृक्षांच्या जंगलातून पुढे चढाई करत अखेर हा संघ समुद्रसपाटीपासून १७५९३ फूट उंचीवर हिमरेषा सुरु होते तेथे जाऊन पोचला. खरे तर प्रौढ व्यक्तीसाठी या उंचीवर पाऊल टाकणे हीच थक्क करणारी कामगिरी ठरते, कारण केवळ अनेक किलोमीटर्सचे अंतर किंवा पर्वतातील खडतर चढण यापेक्षाही येथे विरळ हवा, वातावरणातील प्राणवायूचे कमी प्रमाण व आठ अंश सेल्शियसपासून प्रसंगी उणे बारा अंश सेल्शियसपर्यंत खाली जाणारे तापमान अशा आव्हानांचा सामना करावा लागतो. या मुलांच्या वयाच्या तरुण साहसवीरांसाठी ही मोहीम यशस्वी पूर्ण करणे, ही खरोखर आश्चर्यकारक कामगिरी आहे.
‘ॲडव्हेंचर पल्स’ची स्थापना समीर पाथम व सूरज झिंगान यांनी केली आहे. यापूर्वीही या संस्थेने वर्ष २०१४ मध्ये पुण्यातील बिशप्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सर्वांत मोठा जथा एव्हरेस्ट बेस कॅम्पला यशस्वी नेऊन आणला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट चढाई मोहीम राबवत असताना नेपाळमधील भूकंप व हिमकडे कोसळल्याने या संस्थेच्या गिर्यारोहकांचा संघ एव्हरेस्ट बेस कॅम्पवर अडकून पडला होता. या कसोटीच्या काळातही या सदस्यांनी भूकंपग्रस्तांची सुटका करण्याचे प्रचंड आव्हानात्मक काम करुन सामाजिक बांधीलकीचा प्रशंसनीय प्रत्यय आणून दिला आहे.