पुणे : शहरातील परिस्थिती व कोरोनाचे नवे संकट लक्षात घेऊन पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे.
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, एल्गार परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसांकडे परवानगी मागणारा अर्ज आयोजकांनी केला होता. या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील लोक शासन आंदोलन या संस्थेही ही परवानगी मागितली होती.
कोरेगाव भिमा येथील लढाईला २०० वर्ष होत असल्याच्या निमित्ताने शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भिमा येथे मोठी दंगल झाली होती. त्याचे महाराष्ट्रासह देशभर पडसाद उमटले होते. या परिषदेच्या आयोजनमध्ये बंदी असलेल्या माओवादी संघटनांचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. यातून देशभरातील अनेक डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेचा तपासाचा आढावा घेण्याची सूचना केल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पुणे पोलिसांकडील हा तपास एनआयएकडे सोपविला आहे.

