पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओ. बी. सी. विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओ. बी. सी. विभागाच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेस भवन येथे बैठक घेतली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी भानुदास माळी यांचे फुले पगडी घालून स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार झाला. यावेळी बोलताना भानुदास माळी म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारने या देशामध्ये जाती जातींमध्ये व धर्म-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. लोकशाहीचे सर्व आधारस्तंभ त्यांनी खिळखिळे केले असून न्याय व्यवस्था देखील संशयास्पदरित्या आपली भूमिका जनतेवर लादत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयाने ओ. बी. सी. चे राजकीय आरक्षण रद्द केले. परंतु या गोष्टीचे आम्ही स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने ओ. बी. सी. मधील अनेक जाती ज्या अत्यंत मागासलेल्या आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही जाती निहाय जनगणणा करावी अशी आमची मागणी आहे. याचा अर्थ असा नाही की, आमचे आरक्षण आम्ही सोडू. ओ. बी. सी. राजकीय आरक्षण जरी रद्द झाले असले तरी देखील आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पूर्वीप्रमाणे ओ. बी. सी. समाजाला आरक्षणाची संधी देणार व ओ. बी. सी. च्या हक्कासाठी लढा देखील देणार.’’
कार्यक्रमाचे आयोजन पुण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओ. बी. सी. विभागाचे अध्यक्ष साहिल केदारी यांनी केले होते. महाराष्ट्र प्रदेश ओ. बी. सी. विभागाचे सरचिटणीस सुनील पंडीत व चिटणीस प्रशांत सुरसे यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी राधिका मखामले, हनुमंत राऊत, आण्णा गोसावी, विजय बोडकर, विजय तिकोणे, रमेश पंडित आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

