मुंबई- आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत चुकीच्या नेतृत्वाच्या नाही, असे स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. नेता चुकीचा असला की काय परिणाम होतात हे आज दिसले असे शरद पवारांनी म्हटले आहे. कारण नसताना एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिले. माझे आणि एसटी कर्मचाऱ्याचे घनिष्ठ संबंध आहेत. गेली 50 वर्षे माझ्याशिवाय त्यांचे एकही अधिवेशन झाले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना नेतृत्व चुकीच्या भूमिका घ्यायला लावतात तेच याला जबाबदार असे शरद पवारांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले शरद पवार ?
आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. आपल्याला कुणी चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणे ही आपली जबाबदारी आहे, एव्हढंच मी सांगतो. थोडी माहिती तुम्हाला कळल्याच्या नंतर तातडीने तुमच्याभोवती अनेक सहकारी इथे पोहोचले, ते मी माझ्या पाहण्यात होते. त्यासाठी वेगळे सांगायची गरज नाही. संकट आले की आपण सर्व एक आहोत हेच तुम्ही दाखवले, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद असेही शरद पवारांनी यावेळी म्हटले आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले?
पवारांच्या बाबतीत जाणीव पूर्वक अशी घटना घडने अतिशय चुकीचे आहे. पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी काम केले आहे. मागच्या सरकारने हे करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र मविआ सरकाने त्यांच्या बाजूने भूमिका घेतली. मात्र अशा पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांनी वागणे, हे महाराष्ट्राचा संस्कृतीला न शोभणारी घटना आहे. यावर दिलीप वळसे पाटील योग्य कारवाई करतील. हे ठरवून केलेले षंडयंत्र आहे असा आरोप राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पवारांची विचारपूस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात दोघांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांची विवारपूस करत दूपारच्या आंदोलनाची संपूर्ण माहिती घेतली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांशी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आहे.

