पुणे– पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी शिवाजीनगरमधील पोलीस मुख्यालय रुग्णालय येथे डी.व्ही. सेलेस्टीअल क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदाब (बीपी), शुगर, ईसीजी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी अनेक पोलीस अधिकारी अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, मुख्यालय पोलीस उपआयुक्त विवेक पाटील, पोलीस हेडक्वार्टर हॉस्पिटलचे डॉ. धनंजय राउत, डी.व्ही. सेलेस्टीअल क्लिनिकच्या डॉ. कृती वजीर उपस्थित होत्या.
डॉ. कृती वजीर म्हणाल्या की, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न करताना होणारी ओढाताण तसेच अशातच परिवार आणि नातेसंबंध जपताना ताण-तणावाने पोलिसांचे रोजचं जगणंच व्यापलेलं आहे. ताणतणाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे पोलिसांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे योग्य उपचारांसोबतच संतुलित आहार, निर्व्यसनी जीवनपद्धती, व्यायाम, योग, ध्यानधारणा, मानसिक स्वास्थ चांगले ठेवणे महत्त्वाचे असल्याचे डी.व्ही. सेलेस्टीअल क्लिनिक च्या डॉ. कृती वजीर म्हणाल्या.