पुणे – पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक विलंब न होता वेळेत संपविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न नक्की असेल.विसर्जन मिरवणुकीमध्ये जास्त वेळ खंड पडू नये किंवा रेंगाळू नये याकडे पोलिसांचे विशेष लक्ष असेल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी सांगितले. तसेच स्पीकरबाबत, आवाजाच्या मर्यादेच्या उल्लंघनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे, नागरीकांची तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.मिरवणुक सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 8000 पोलीस कर्मचारी, 1200 CCT, SRPF आणि होमगार्डच्या अतिरिक्त कंपन्यांसह स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.
विसर्जन मिरवणुक सोहळ्यातील बंदोबस्ताची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरीक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा उपस्थित होते. कोरोनामुळे विसर्जन मिरवणुक झाली नव्हती. दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाचा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने पार पडला. अनंत चतुर्दशी दिवशी (ता. 9) शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रथेप्रमाणे महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. विसर्जन मिरवणुक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.
गुप्ता म्हणाले, ‘विसर्जन मिरवणूकीत रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन मंडळांनी करावे. उच्चक्षमतेचे स्पीकर किंवा आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास आणि नागरीकांनी तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्वरीत कारवाई केली जाईल. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दागिने, मोबाइल हिसकावणे, छेड काढणे असे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके गस्त घालणार आहेत.
मेट्रोच्या पुलामुळे देखाव्यांची उंची मोजली जाणार
खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलामुळे मिरवणुकीतील देखाव्यांची उंची फुटांपेक्षा कमी असावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गुरुवारी ( सप्टेंबर) मध्यरात्रीपासून विसर्जन मिरवणूकीत मंडळाचे रथ विसर्जन मार्गावर दाखल होतात. देखाव्यांची उंची पोलिसांकडून मोजण्यात येणार आहे. त्यामुळे खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलाच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी नमूद केले.
असा असेल मुख्य मिरवणुकीसाठी पोलिसांचा बंदोबस्त
– अतिरीक्त पोलिस आयुक्त – 4
– पोलिस उपायुक्त – 10
– सहाय्यक पोलिस आयुक्त – 21
– वरिष्ठ पोलिस निरीक्षक – 55
– पोलिस उपनिरिक्षक/सहाय्यक पोलिस निरीक्षक – 379
– पोलिस कर्मचारी – 4 हजार 579
बंदोबस्तासाठी बाहेरुन बोलाविण्यात आलेले अधिकारी कर्मचारी
– सहाय्यक पोलिस आयुक्त – 4
– वरिष्ठ पोलिस निरीक्षक – 10
– सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक – 50
– पोलिस कर्मचारी – 250
– एसआरपीएफ कंपन्या – 02
– गृहरक्षक दल – 259
अनंत चतुर्दशी दिवशी (ता.9) गणेश विसर्जन होणारी मंडळे/घरगुती गणपती
– सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे – 2 हजार 969
– घरगुती गणपती – 2 लाख 22 हजार 977
आत्तापर्यंत झालेले गणेश विसर्जन सद्यस्थिती
– 1 ते 7 सप्टेंबर पर्यंत गणेश विसर्जन झालेली सार्वजनिक मंडळे – 333
– 1 ते 7 सप्टेंबर पर्यंत विसर्जन झालेले घरगुती गणपती – दोन लाख 4 हजार 653
विसर्जन मिरणुकीतील पोलिस बंदोबस्ताची वैशिष्ट्ये
– विसर्जन मिरवणुकीचे पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण
– विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
– गर्दीच्या ठिकाणी वृद्ध, महिला, बालकांवर विशेष लक्ष
– चोरी, छेडछाड टाळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सक्रीय
– विसर्जन मार्गावर नागरिकांसाठी मदत केंद्र
इथे साधा संपर्क
– संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तु आढळल्यास त्वरीत संपर्क साधा – 112 ( पोलिस नियंत्रण कक्ष)
– अग्निशामक दल – 101
यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार असून, शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता महात्मा फुले मंडई येथे असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास विक्रम कुमार पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूकीस सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. शहरातील सगळ्या घाटांवर सुरक्षेसाठी लाईफ गार्ड उपस्थितीत असणार असून, घरगुती गणपती विसर्जनासाठी शहरात फिरते हौद असणार उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहे, फिरती शौचालयांची उभारणीदेखील करण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशी दिवशी (ता.9) गणेश विसर्जन होणारी मंडळे/घरगुती गणपतींच्या संख्येत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या 2 हजार 969 तर, घरगुती गणपती 2 लाख 22 हजार 977 इतके आहेत. आत्तापर्यंत 1 ते 7 सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन झालेली सार्वजनिक मंडळे – 333 असून, 1 ते 7 सप्टेंबरपर्यंत विसर्जन झालेले घरगुती गणपतींची संख्या दोन लाख 4 हजार 653 इतकी आहे.