पुणे दि. १८: किल्ले सिंहगडाचे ऐतिहासिक महत्व व गडाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सकाळी ६ वाजता सिंहगडाच्या पायथ्यापासून ते किल्ल्याच्या माथ्यापर्यंत विखुरलेल्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण पुणे वन विभागाच्यावतीने निष्कासित करण्यात आले.
किल्ले सिंहगडावर गेल्या काही वर्षापासून गडाच्या पार्किंगपासून ते माथ्यापर्यंत खाद्यपदार्थ स्टॉल धारकांनी विविध ठिकाणी प्लास्टिक कागद वापरुन अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. या अतिक्रमणधारकांना कायदेशीर पद्धतीने नोटीस देऊन पुणे वनविभागाने अवैध झोपड्या हटविल्या आहेत.
अतिक्रमणधारक स्टॉल धारकांची निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत सोय करण्याचे वनविभागाच्या विचाराधीन आहे. अतिक्रमणधारकांच्या रोजगार निर्मितीचा प्रश्न संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकामार्फच सोडविण्यात आला आहे, अशी माहिती पुणे वन विभागाने दिली आहे.
अतिक्रमण हटवल्यानंतर वाहनतळाची जागा विस्तारली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार असून सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे, असे उपवनसंरक्षक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.