पुणे – प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने व पुणेकर नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे पुणे शहरात झपाट्याने वाढलेल्या रुग्णसंख्येला निश्चितच आळा बसला आहे. रुग्णसंख्या कमी होणे ही बाब दिलासादायक असली, तरी अद्याप करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, घरोघरी जाऊन गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून गणले जावे आणि प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्यात यावे, असे पत्र माजी स्थायी समिती अध्यक्ष,नगरसेवक विशाल तांबे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
त्यांनी पत्रात असे म्हंटले आहे कि,सध्या पुण्यातील रुग्णसंख्या कमी होत असून, करोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी थोपविण्यात यश आले आहे. यात निश्चितच प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पाळलेले नियम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला जीव धोक्यात घालून कार्यरत असलेले ‘फ्रंटलाइन वर्कर’ यांचे योगदान आहे. करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील गॅस सिलिंडर घरोघरी पोचविणारा कर्मचारी हा घटक अद्याप लसीकरणापासून दूर आहे. सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांना घरोघरी जावे लागते. अनेक ठिकाणी लिफ्ट बंद असल्यास सिलिंडरचे ओझे वाहत कित्येक मजले चढावे लागते. अशा वेळी मास्क लावून जिने चढणे कठीण असते. त्यामुळे, अनेकदा त्यांना मास्क काढावे लागते. त्यात एखादा कर्मचारी करोना बाधित असेल आणि तो कोणाच्या संपर्कात आला, तर करोना धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश ‘फ्रंटलाइन वर्कर’मध्ये करावा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
वास्तविक, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत २२ मे रोजी झालेल्या ‘झूम’ बैठकीत घरोघरी सिलिंडर पोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची एकमताने मागणी करण्यात आली होती. आयुक्त म्हणून आपणही या मागणीची नोंद घेऊन सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली होती. मात्र, अद्याप यावर काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व घटकांपर्यंत लस कशी पोचली जाईल, याबाबत विविध उपाययोजना केल्या जात असताना सिलिंडर पुरवठा करणारे कर्मचारी दुर्लक्षित न राहता त्यांच्या लसीकरणास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

