निवडणुका १/२ महिन्यात जाहीर होऊ शकतात कार्यकर्त्यांनी तयार रहावे -अजित पवार

Date:

शिर्डी -राज्यातल्या २३ महानगरपालिका, २२१ नगरपरिषदा-नगरपंचायती, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि ७ हजार ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका १/२ महिन्यात जाहीर होऊ शकतात कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे आवाहन करताना आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भिडे गुरुजींवर हल्ला चढविला ते म्हणाले ,’महाराष्ट्राचं मंत्रालय जे आजपर्यंत पुरोगामी निर्णयांसाठी ओळखलं जायचं… त्याच मंत्रालयात एका महिला पत्रकाराला, एक व्यक्ती, भारतमाता विधवा नाही. तुम्ही कुंकु-टिकली लावून या मगच मी बोलेन… अशा पद्धतीची भाषा वापरतो. हे गंभीर, निषेधार्ह आहे, अशी भूमिका अजितदादांनी मांडली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या शिबिराला पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. ते म्हणाले,’ ‘सबका मालिक एक…’, ‘श्रद्धा आणि सबुरी..’ सारखा संदेश देणाऱ्या, अध्यात्माच्या माध्यमातून लोकसेवेचा डोंगर उभा करणाऱ्या, श्री साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश शाखेतर्फे आयोजित, ‘राष्ट्रवादी मंथन–वेध भविष्याचा’ अभ्यास शिबिर होत आहे. दोन दिवसांच्या अभ्यास शिबिराला, राज्यभरातून उपस्थित, पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पक्षाचा ‘बॅकबोन’, संघटनेचा मुख्य कणा असलेले कार्यकर्ते बंधू-भगिनी, पक्षाचं भविष्य ज्यांच्या हातात आहे, ते तरुण मित्र, पक्षाचे सर्व हितचिंतक, उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्वात पहिल्यांदा, मी मनापासून स्वागत करतो. आज कार्तिकी एकादशी आहे. कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरपूरच्या पांडुरंगाला, वारीच्या भक्ती परंपरेला वंदन करतो. समस्त वारकरी बांधवांना, आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पांडुरंगाला साकडं घालतो. हे बा-पांडुरंगा, महाराष्ट्रावर तुझी कृपा कायम ठेव, राज्याची भरभराट कर, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला यश दे, प्रत्येक घरात सुख-शांती येऊदे. धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी होऊदे, महागाई, बेरोजगारीचं राज्यावरचं संकट दूर कर, अशी प्रार्थना मी बा विठ्ठलाच्या चरणी करतो. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे. या शिबिराच्या नियोजन, आयोजन, समन्वयात योगदान दिलेले पक्षातील सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बंधू-भगिनींचं अभिनंदन करतो. आभार मानतो. धन्यवाद देतो. शिबिराच्या आजच्या पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी जे मान्यवर अभ्यासक, विश्वेषक या शिबिराला मार्गदर्शक करत आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या जाणीवजागृतीसाठी आपण दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद देतो. ‘मंथन’ म्हटलं की पुराणातली ‘समुद्रमंथना’ची गोष्ट आणि त्या मंथनातून निघालेल्या अमृत आणि विषाची कथा आठवण्याची शक्यता आहे. पुराणातल्या त्या ‘समुद्रमंथना’शी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वैचारिक ‘मंथना’चा काहीही संबंध नाही. आपलं ‘मंथन’ हे विचारांचं मंथन आहे. या मंथनातून, देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या भल्यासाठी, चांगलं शोधण्याचा, खुप काही चांगलं करण्याचा हा प्रयत्न आहे. येणाऱ्या भविष्यकाळात पक्षवाढीसाठी, राज्याच्या विकासासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काय केलं पाहिजे. पक्षकार्यकर्त्यांची भूमिका कशी असली पाहिजे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं विचार केला पाहिजे, सत्यशोधक विचारांची कास कशी धरली पाहिजे, हे ठरवण्यासाठी हे मंथन शिबिर आहे. सध्याच्या राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीवर, पक्षाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन, पक्षाची, पुढच्या वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी हे अभ्यास शिबिर महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची ध्येय-धोरणं माहित असली पाहिजेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक प्रश्नांकडे, कार्यकर्त्यांनी चिकित्सक पद्धतीनं बघितलं पाहिजे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संविधान आणि लोकशाहीच्या मुल्यांबाबत सजग असला पाहिजे. यासंबंधीची जाणीव निर्मिती आणि जाणीव जागृतीसाठी हे मंथन शिबिर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातल्या, देशातल्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याला त्यांची जबाबदारी समजावून सांगण्यात आणि ती पार पाडण्याचं बळ देण्यात, प्रदेश राष्ट्रवादीनं आयोजित केलेलं हे ‘राष्ट्रवादी मंथन–वेध भविष्याचा’ अभ्यास शिबिर यशस्वी होईल, असा विश्वास अजितदादा यांनी व्यक्त केला. अजितदादा म्हणाले, या शिबिरात आपल्यसमोर बोलण्यासाठी ‘राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुका’ हा विषय मला दिला आहे. अनेक कारणांसाठी हा विषय महत्वाचा आहे, असं मला वाटतं. येणाऱ्या काळात, लवकरच, राज्यातल्या २३ महानगरपालिका, २२१ नगरपरिषदा-नगरपंचायती, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि ७ हजार ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांची पूर्वतयारी या शिबिरातून आपल्याला करायची आहे. सर्वोच्च न्यायालयानं सद्यस्थितीत, ग्रामपंचायती वगळता, इतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘जैसे थे’ आदेश दिला आहे. असं असलं तरी, ही स्थगिती कधीही उठू शकते. निवडणुका एक-दोन महिन्यात जाहीर होऊ शकतात, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहिलं पाहिजे. मला आनंद आहे की, अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. ही आघाडी आणि वेग आपल्याला टिकवायचा आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतून, पक्षाच्या गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकाधिक कार्यकर्त्यांना, सत्तेत येण्याची, लोकसेवा करण्याची संधी मिळत असते. स्थानिक स्वराज संस्थांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हेच स्थानिक सत्तेच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी, पक्षाच्या बळकटीकरणासाठी ताकद देत असतात. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भविष्यातले आमदार, खासदार पक्षाला मिळत असतात. त्यातून पक्षसंघटन वाढते. स्थानिक स्वराज संस्थांमधलं यशंच, येणाऱ्या काळात पक्षाची, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणार आहेत, हे लक्षात घेऊन अधिकाधिक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आणि ग्रामपंचायतीत आपल्या विचारांची माणसं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अजितदादांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले. प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, माझ्यासह, पक्षाच्या जिल्हा, तालुका अध्यक्षांपासून बुथ-मतदार यादी लेव्हलपर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनं, आतापासून कामाला लागावे. मतदार यादी बुथप्रमुख, पन्ना प्रमुख यांच्याशी स्थानिक नेतृत्वाने संपर्कात राहावे. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा, त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करावा, असे अजितदादांनी सांगितले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, पंचायत राज्य व्यवस्था आणली. स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम केले. नंतरच्या काळात आदरणीय साहेबांच्या नेतृत्व, मार्गदर्शनात महिलांसाठी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये, महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय आपण घेतला. हा निर्णय महिलांपर्यंत, घराघरात पोहचवला पाहिजे. आज स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 50 टक्के महिला निवडून येतात. त्या जागांवर, राष्ट्रवादीच्या विचारांच्या उमेदवार अधिकाधिक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणसाठी राष्ट्रवादीने केलेले कार्य घराघरात पोहचवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राज्याच्या ज्या मंत्रालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, (अगदी देवेंद्र फडणवीस साहेब) यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या अधिकार, मानसन्मानाचे अनेक निर्णय घेतले. महाराष्ट्राचं मंत्रालय जे आजपर्यंत पुरोगामी निर्णयांसाठी ओळखलं जायचं… त्याच मंत्रालयात एका महिला पत्रकाराला, एक व्यक्ती, भारतमाता विधवा नाही. तुम्ही कुंकु-टिकली लावून या मगच मी बोलेन… अशा पद्धतीची भाषा वापरतो. हे गंभीर, निषेधार्ह आहे, अशी भूमिका अजितदादांनी मांडली. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहीली आहे. मंडल आयोगावेळी ओबीसी आरक्षणाची बाजू उचलून धरण्याचं काम पवार साहेब आणि भुजबळ साहेबांनी केलं होतं. मंडल आयोग ते बांठिया आयोग, असा हा राष्ट्रवादीचा प्रवास कायम ओबीसी बांधवांच्या बाजूचा राहिला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडी सरकारने, राज्यात बांठिया आयोग स्थापन करून, त्यांच्या अहवालाच्या आधारे ओबीसी बांधवांनाना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षण मिळवून दिलं. आज भलतेच लोक त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी आरक्षणाला कायम विरोध केला, अशी टीका करत ओबीसींच्या मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या त्या ढोंगी लोकांचा बुरखा फाडण्याचं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, असे आवाहन उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे; हे खरं असलं तरी राज्य शासन आणि न्यायालयांनीही त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाला त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी, या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षित असते. मला वाटतं की, निवडणुका लांबविणे ही सध्याच्या शिंदे सरकारची गरज झाली आहे. त्यांना जनाधार नाही. लोकांची सहानुभूती महाविकास आघाडीकडे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय त्यांची चूकही त्यांना उमगली आहे; पण ते जाहीरपणे कबूल करू शकत नाही. सरकारं येतात जातात; निवडणुकीत मतदारांनी विजयी कौल दिल्यावर सरकार येते, ते खरे कर्तृत्व असते. त्यात आनंद असतो किंवा पराभव झाला तरी तोही जनतेचा कौल असतो; पण गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे ही चोरवाट आहे, अशा शब्दांत अजितदादांनी टीका केली. मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात राज्यात येऊ घातलेले चार मोठे प्रकल्प गुजरातला दिले गेले. इथल्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले गेले. हेच आपल्याला जनतेपर्यंत पोहचवायचे आहे. या प्रकल्पांसाठी दिल्लीला जावून पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांना भेटण्याचं, त्यांच्याकडे मागणी करण्याचं धाडसही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखवू शकत नाहीत. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. हे शिंदे सरकार जितकं सत्तेवर राहील, तितकं अधिक महाराष्ट्राचं, इथल्या जनतेचं नुकसान करत राहतील, ही राज्यातल्या जनतेची लोकभावना आहे, असे अजितदादा म्हणाले. राज्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. महापुर आला. शेतकऱ्यांचं खरीपाचे पिक पूर्णपणे वाहून गेले आहे. पशुधन वाहून गेलं. शेतजमीनी पिकासह खरवडून गेल्या आहेत. येणाऱ्या काही वर्षात या जमीनींचं नुकसान भरुन येणार नाही. लोकांच्या घरांचं, दुकानांचं नुकसान झालं आहे. रबी हंगामात पेरणी झालेल्या पिकाचंही नुकसान झालं आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कर्जाची परतफेड करणं शक्य नसल्यानं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी गेली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना आधार, दिलासा देण्यासाठी, राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आपण केली. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर, राज्यातला नुकसानग्रस्त शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही, हे वास्तव आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, खरीपाचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत करावी, अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी, अशी मागणी अजितदादांनी केली. यासंदर्भात, मी दिवाळीआधी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन पत्र दिलं होतं. त्या मागणीचा अजून विचार झाला नाही, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना, दिवाळीत दिलासा देण्याची संधी, राज्य सरकारनं गमावली, हे राज्यातल्या शेतकऱ्यांचं आणि १३ कोटी जनतेचं दुर्दैवं आहे. ही वस्तुस्थिती आपापल्या मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे.असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...