नवी दिल्ली -निवडणूक आयुक्त श्री. अनुप चंद्रा पांडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त भारतीय निवडणूक आयोगाचे महासचिव श्री. उमेश सिन्हा, महा संचालक श्री. धर्मेंद्र शर्मा यांच्यासह निवडणूक आयोगाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नवी दिल्ली येथील इंडिया आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेच्या (IIIDEM) आवारात वृक्षारोपण केले. त्यांनी यावेळी एका पुस्तिकेचे प्रकाशन केले. तसेच भारतीय निवडणूक आयोग आणि राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना निवडणूक आयुक्त श्री अनुप चंद्रा पांडे म्हणाले, कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्निर्मिती करा हा पर्यावरण सापेक्ष निवडणूक व्यवस्थापनाचा आमचा दृष्टीकोन आहे. पर्यावरण दिवस दर वर्षी साजरा केल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित होते. यंदाची पर्यावरण दिनाची संकल्पना ‘निसर्गाशी एकरूपतेने जगणे’ ही असून ‘केवळ एक पृथ्वी’ हे त्याचे समर्पक घोष वाक्य असल्याचं ते म्हणाले. भारतीय निवडणूक आयोगाने मतदात्यांची ऑनलाईन नोंदणी यासह विविध प्रक्रियांचे डीजीटायझेशन करून तसेच मतदाता हेल्पलाईन ॲप, सुविधा पोर्टल सुविधा पोर्टल, केवायसी ॲप, सी-विजील, ई-एपिक, पीओडब्ल्यूडी ॲप, मतदाता मोजणी ॲप, विविध भागाधाराकांशी संबंधित प्रक्रियेचे डिजिटलायझेशन, उमेदवारांचे ऑनलाईन नामांकन, एकदाच वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा व्यवस्थापन यासारख्या उपक्रमांमधून पर्यावरण पूरक पद्धतीने निवडणुका सुनिश्चित केल्याचं ते म्हणाले.

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांना प्लास्टिक आणि अन्य घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत सरकारने अधिसूचित केलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी सरकारी नियमानुसार फ्लेक्स, पत्रके, पिशव्या आणि अन्य प्रसिद्धी साहित्याची काळजी घ्यावी, आणि एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे निर्देश दिले आहेत.
