लखनौ: केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मतदानयंत्रात घोटाळा करून उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक जिंकल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. मुस्लीम समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात भाजपला इतरांपेक्षा अधिक मते मिळालीच कशी; असा सवालही त्यांनी केला आहे. भाजपच्या या कृत्याने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात मतदारांनी समाजवादी पक्ष किंवा बसपला मत देण्यासाठी त्यांच्या चिन्हावर बटन दाबले; तरी ती मते देखील भाजपच्या पारड्यात पडल्याचे दाखले आपल्याकडे असल्याचा दावाही मायावती यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना पात्र लिहून पुन्हा जुन्या मतपत्रिका-मतपेटीच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्या; अशी मागणीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे.
भाजपने लोकशाहीची हत्या केली असून हेचसुरु राहिले तर सन २०१९ मध्ये पुन्हा भाजप सत्तेवर येईल. मतदारांचा ‘इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन’वरचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी बसप पुढाकार घेणार असून इतर पक्षांनीही त्याला साथ द्यावी; असे आवाहनही त्यांनी केले. उत्तरप्रदेशप्रमाणेच उत्तराखंड निवडणुकांचे निकाल संशयास्पद आहेत. मात्र छोट्या राज्यांमध्ये निष्पक्ष निवडणूक झाल्या असून त्या ठिकाणी भाजपाचीअवस्था बिकट असल्याचा आरोप माया वती यांनी केला.