मुंबई -शिवसेना नेते एकनाथ शिदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला.त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या शपथविधीला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होते. तसेच, भाजपा नेते आशिष शेलार उपस्थित होते.बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यावर त्यांनी सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र राजभवनात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली होती . तसेच या नव्या मंत्रीमंडळात आपण सहभागी होणार नसून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू असे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपच्या नेतृत्वाने फडणवीस यांनीही मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी सूचना केली. दिल्लीतून त्यांना त्यासाठी २ वेळा फोन आले.त्यानंतर . त्यानुसार फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली .
राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर श्री. शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा उल्लेख करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या सोहळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह सर्वश्री प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर तसेच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, नितीन गद्रे, प्रधान सचिव दीपक कपूर, मनीषा म्हैसकर, विकास खारगे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
त्यानंतर मंत्रालयात श्री.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व वरिष्ठ अधिकार उपस्थित होते.