सरकारचा रिमोट देवेंद्र यांच्या हाती?
मुंबई- एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याच्या राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. गेल्या दहा दिवसांपासून हा सत्तासंघर्ष सुरू होता. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येती होती. मात्र, फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार शिंदे हे आज सायंकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
पाच वर्षांच्या आमच्या कार्यकाळात राज्याचा जो विकास झाला तो गेल्या अडीच वर्षात पूर्णपणे संपला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेट्रो असेल, वेगवेगळे प्रकल्प असतील किंवा ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न असेल हा विषय असेल. मराठा आरक्षणापासून ते सर्व विषय हे आका निश्चित टप्प्यापर्यंत जातील. दुर्बल घटकांना न्याय देण्याचा हे सरकार प्रयत्न करेन, असा मला विश्वास आहे.” लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपाचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील. मी स्वत: बाहेर असेन. पण हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझीदेखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार,” अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आमच्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे. पाऊस खूप आहे, मांडव टाकलेला नाही. कुणालाही निमंत्रण जाऊ शकत नाही. छोटा शपथविधी सोहळ होत आहे. म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागतो. भाजपाचे कार्यकर्ते असतील, एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे कार्यकर्ते असतील कुणालाही या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे कुणीही येथे येण्याचा प्रयत्न करू नये.”

