राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. मात्र खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहिणी यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
रोहिणी खडसे या जळगावातील राजकारणात सक्रीय आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. रोहिणी खडसे यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोहिणी खडसे ट्विट करत म्हणाल्या की, ‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे.’

