पुणे-
” भारतीय संस्कृती, कला, परंपरा जपणारी आणि इतिहासाची साक्षीदार असलेली अनेक गावे बदलत्या काळात आधुनिकतेच्या नावावर नष्ट होत चालली आहेत. त्यामुळे अशा गावांची वा शहराची सांस्कृतिक ओळख नकळतपणे पुसली जात आहे ही चिंताजनक बाब असून त्या पार्श्वभूमीवर ‘एका पक्ष्याची गोष्ट’ हा वाई शहरावर आधारित लघुपट दिलासा देणारा ठरला आहे असे अभिनेता सुबोध भावेने रविवारी येथे सांगितले.
इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅन्ड कल्चर हेरिटेजतर्फे वाई शहरासंदर्भात तयार करण्यात आलेल्या ‘एका पक्ष्याची गोष्ट’ या लघुपटाच्या डिव्हीडीचे प्रकाशन सुबोध भावेच्या हस्ते फिल्म इंस्टीट्युटच्या सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ लीला पुनावाला तसेच लघुपटाच्या निर्मात्या वनिता जाधव, जगन्नाथ जाधव, दिग्दर्शक भाई डोळे, लेखक प्रविण जोशी, अभिनेते सौरभ गोगटे, अभिनेत्री ज्योती मालशे, शिवराज वाळवेकर, संगीतकार नरेंद्र भिडे आदी उपस्थित होते.
सुबोध भावे ने असेही सांगितले , अलिकडच्या काळात पुणे शहर इतके बदलले आहे की, ते एकेकाळी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर होते हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही कारण या शहराच्या जुन्या ऐतिहासिक खुणा नष्ट होत चालल्या आहेत. अशा खुणा जतन करण्याची करण्याची फार गरज आहे. डॉ. लीला पूनावाला म्हणाल्या, सरकारने ऐतिहासिक वास्तु आणि सांस्कृतिक साधनांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्पोरेट कंपन्यांना सहभागी करुन घेतले पाहिजे. ऐतिहासिक व सांस्कृतिक शहरे ही केवळ पर्यटन केंद्रे नसून तो एक आपला इतिहास आहे हे नव्या पिढीला सांगितले तरच ते या वास्तुंच्या जतनासाठी पुढाकार घेतील. प्रारंभी जगन्नाथ जाधव यांनी प्रास्ताविक केले. या लघुपटाच्या निर्मितीत सहभागी असणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा यावेळी सुबोध भावेच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले.
उपस्थितांना हा लघुपट दाखविल्यानंतर लघुपटाच्या निर्मात्या वनिता जाधव, जगन्नाथ जाधव, दिग्दर्शक भाई डोळे, लेखक प्रविण जोशी, अभिनेते सौरभ गोगटे, अभिनेत्री ज्योती मालशे, शिवराज वाळवेकर, संगीतकार नरेंद्र भिडे आदींशी संवाद साधताना मंजिरी धामणकर यांनी या लघुपटाचे अंतरंग उलगडले.