श्री शिवाजी मराठा सोसायटी तर्फे संस्थेचे संस्थापक गुरुवर्य बाबुराव जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिष्यवृत्ती वाटप
पुणे : मागील ७५ वर्षात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. परंतु केवळ शिक्षण घेऊन उपयोग नाही तर त्यामध्ये उत्कृष्टता आली पाहिजे. शाळेतच नव्हे तर जगात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट व्हायला पाहिजे. शिक्षणात ज्यावेळी नवीन तंत्रज्ञान येते त्यावेळी क्रांती होते. शिकवणे म्हणजे केवळ माहिती द्यायची नाही तर सामाजिकता जोपासत कला, विज्ञान, तंत्रज्ञान या दृष्टीने शिक्षकांनी शिक्षणाकडे पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेला वाव देणारे शिक्षण शैक्षणिक संस्थांनी द्यायला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. राम ताकवले यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटी तर्फे संस्थेचे संस्थापक गुरुवर्य बाबुराव जगताप यांच्या पुण्यतिथी समारंभानिमित्त गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार पेठेतील संस्थेच्या जिजामाता सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव, आप्पासाहेब तावरे, राजेंद्र ढेरे, बाळासाहेब गांजवे, नंदकुमार गोराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता बारणे – यादव, सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, राजेंद्र जगताप, विकास गोगावले, सत्येंद्र कांचन, जगदीश जेधे, पद्माकर पवार, अॅड. एन.डी.पाटील उपस्थित होते.
प्रा. डॉ. राम ताकवले म्हणाले, शाळेतला शिक्षक आणि संस्थापक कसा असावा हे गुरुवर्य बाबुराव जगताप यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. ते नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ होते. नैतिकतेची शिक्षणात गरज आहे. नैतिकतेमुळेच माणूस मोठा होतो आणि जगप्रसिद्ध होतो. परंतु नैतिकता शिकवता येत नाही तर ती कृतीतून दाखवावी लागते. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या कृतीतून ती विद्यार्थ्यांना शिकविली पाहिजे. कारण तुम्ही काय शिकवतात याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष नसते तर कसे वागता याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असते.
बाबा आढाव म्हणाले, शिक्षण संस्थांनी तंत्रज्ञानाप्रमाणे आता बदलायला पाहिजे. काळाची पाऊले वेगाने पुढे जात आहेत. नवा देश घडवायचा असेल तर आपल्यात बदल घडवायला पाहिजे. वेळेची किंमत समजून घ्या, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.
अण्णा थोरात यांनी प्रास्ताविक केले. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. बी.एम. गायकवाड यांनी आभार मानले.

