मुंबई ठाण्यातील शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलांच्या घरांवर आणि कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र ही छापेमारी कोणत्या प्रकरणी केली जात आहे याचा कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक अशी प्रताप सरनाईकांच्या मुलांची नावे आहेत. दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे.दरम्यान विहंग ला गाडीत बसवून इडी अधिकारी सोबत घेऊन गेल्याने त्यास ताब्यात घेतल्याचे मानले जाते आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंगच्या संशयावरून ही छापेमारी केली जात आहे. यासोतबच सरनाईक यांच्या संबंधीत इतर 10 ठिकाणांवरही छापेमारी केली असल्याची बोलले जात आहे. सरनाईक हे ठाण्यातील ओव्हळा-माजीवाडा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. यासोबतच ते मीरा-भाईंदर परिसराचे शिवसेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते आहेत.
दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोट प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी यांना आवाज उठवत विरोध केला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसेच त्यांची कोंडी करता यावी यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

