मुंबई-शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या कार्यालयांवर तसेच घरांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यानंतर राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या कारवाईचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्वागत केले आहे. यासोबतच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर थेट आरोप केले आहेत.
प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईविषयी बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या बेनामी असतील. या कंपन्यांचे काम व्यवस्थित नसतील. सरकारी पैसा किंवा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी वळवला असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सरनाईक यांच्याबद्दल मी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकल्या असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे.
ठाकरेंवर केले आरोप
यासोबतच किरीट सोमय्यांनी थेट ठाकरे कुटुंबावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ‘शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे मुंबई, ठाण्यातील अनेक नेते महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हफ्ते घेत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का? असा प्रश्नही सोमस्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.

