मुंबई:
मुंबई भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर सुरू असलेला ‘आत्मनिर्भर चहा’ स्टॉल हा उपक्रम शेकडो कुटुंबियांसाठी स्वयंरोजगाराचे प्रभावी माध्यम ठरत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे असे गौरवोद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. भाजपा मुंबई ओबीसी मोर्चाच्या वतीने आत्मनिर्भर चहा स्टॉलचे वितरण दादर येथील वसंत स्मृती कार्यालय येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चातर्फे सुरू असलेल्या ‘आत्मनिर्भर चहा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वयंपूर्णतेची हाक दिली आहे. भारताला जगातील सर्वात मजबूत आणि प्रतिष्ठित देश बनविण्यासाठी आर्थिक विकास महत्वाचा आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाने नेहमीच आर्थिक पाठबळ दिले आहे. या नवीन उपक्रमांतर्गत आम्ही मुंबईतील शेकडो कुटुंबांना सक्षम बनवू असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपा मुंबई सचिव प्रतिक कर्पे, भाजपा मुंबई ओबीसी मोर्चा अध्यक्ष नरेंद्र गावकर
पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

