- पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळ असलेल्या पुण्यनगरीच्य अष्टविनायक गणपती मंडळांतर्फे जगातील उत्तम ५० महापौरांमध्ये मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल तसेच अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड आणि कोविडच्या काळात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल सन्मान.
पुणे : कोविड काळात पुण्याचा पालक म्हणून काम करताना अनेक चांगले-वाईट प्रसंग समोर आले. हा काळ खूप कठिण होता. गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता आणि महापौर अशा दोन्ही बाजूंनी मी या परिस्थितीला सामोरे गेलो. कार्यकर्ता म्हणून अनेक निर्णयांप्रती मनातून दु:खी होतो. पण पुणेकरांचे सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्याची देखील जबाबदारी होती. याच काळात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली. सर्व मंडळे सोबत आहोत, हा विश्वास दिला. या गणेश मंडळाच्या संघटनशक्तीची साथ असल्यानेच कोविड काळात चांगले कार्य करु शकलो, असे सांगत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गणेशोत्सव मंडळांप्रती ॠण व्यक्त केले.
पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळ असलेल्या पुण्यनगरीच्या अष्टविनायक गणपती मंडळांच्यावतीने जगातील उत्तम ५० महापौरांमध्ये मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल तसेच अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड आणि कोविडच्या काळात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल केसरी वाडयातील लोकमान्य सभागृहात सन्मान करण्यात आला. यावेळी श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, केसरी वाडा गणपतीचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सन्मान केला. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे सन्मानाचे स्वरुप होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी जगाला वेगळी ओळख दिली. मागील कोविड काळातील दोन वर्षांमध्ये आपली परंपरा जपत सामाजिक भान राखून उत्सव साजरा केला गेला. समाजातील गरजूंना आधार देत, त्यांना जगवत कार्यकर्ते अहोरात्र रस्त्यावर कार्यरत होते. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांकडून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सन्मान झाल्याचा आनंद आहे. गणेशोत्सव कार्यकर्ता ते पुण्याचा महापौर व गणेशोत्सवाचा यजमान हा प्रवास करताना कायमच गणेश मंडळांचे कार्यकर्ते पाठिशी उभे होते, असेही त्यांनी सांगितले.
श्रीकांत शेटे म्हणाले, कोविड काळात स्वत: कुटुंबासह बाधित होऊन देखील महापौरांनी झोकून देऊन काम केले. गणेशोत्सवाचे पालकत्व महापौरांकडे असते. त्यामुळे त्यांच्यातील कार्यकर्ता नेहमीच आम्हाला दिसून आला. गणेशोत्सव शिस्तीत व नियमात व्हावा, याकरीता पोलीस, मनपा व मंडळांमधील सन्मवयाची जबाबदारी महापौरांनी उत्तमरितीने पार पाडली. त्याबद्दल हा सन्मान होत असून असा सन्मान पहिल्यांदाच होत आहे, असेही ते म्हणाले.
महेश सूर्यवंशी म्हणाले, जागतिक पातळीवर कर्तृत्व सिद्ध झालेले पुण्याचे महापौर आहेत. मंडप शुल्क माफ करण्यापासून कमानी व रनिंग मंडपाला परवानगी देण्याचा दिलासादायक निर्णय त्यांनी घेतला. विसर्जन व्यवस्था व मूर्तीकारांचे प्रश्न देखील चांगल्या पद्धतीने हाताळले. आता पुण्याचे प्रश्न त्यांनी राज्य व देशपातळीवर घेऊन जावे, त्याकरीता सर्व गणेश मंडळे त्यांच्यासोबत आहेत, असेही त्यांनी सांगितले. अण्णा थोरात यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मिलींद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पंडित यांनी आभार मानले.

