पुणे-फेब्रुवारीच्या अखेरीस द्यायला हव्या होत्या त्या सुविधा मार्च च्या अखेरीस देणाऱ्या पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला कोरोनाच्या थैमानाला रोखण्यात अपयश आले असून त्यांच्या विलंबकारी निष्काळजीपणामुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाल्याचा आरोप शिवसेनेने आज केला आहे . आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि विविध मागण्या केल्या . शहरप्रमुख संजय मोरे,गटनेते पृथ्वीराज सुतार , विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल ,शाम देशपांडे ,प्रशांत बधे,संजय भोसले, अशोक हरणावळ, अभय वाघमारे, प्रविण डोंगरे, राहुल जेकटे, युवराज पारिख आदीचा या शिष्टमंडळात समावेश होता.
या वेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,’ पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये सध्या कोरोना संक्रमणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. रोज 4000 पर्यंत कोरोना रूग्ण संक्रमित होत आहेत. तसेच रुग्णांचा मृत्यूदर देखील 30 ते 40 च्या दरम्यान झाला आहे. पुणे शहरामध्ये कोरोना रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. कोरोना रुग्णांना ICU बेड मिळत नाहीत, तसेच व्हेंटिलेटर बेड देखील उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांचे मृत्यु प्रमाण वाढत आहे.
सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना खाजगी रूग्णालया मध्ये उपचार घेणे त्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या सर्व रूग्णालयामध्ये कोरोना संक्रमित रुग्णांचे उपचार सुरू करणे आवश्यक आहे. अशामुळे गोरगरीब व सर्व सामान्य पुणेकर नागरिकांना कोरोना संक्रमणात उपचार मोफत मिळतील. पुणे महानगरपालिकेच्या रूग्णालयामध्ये कोरोना बाधित रूग्णांना लागणारी औषधे 24 तास मोफत देण्यात यावी. व प्रत्येक रूग्णालयात डाॅक्टरांची टीम 24 तास उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच जंबो कोविड सेंटर हे मागील वर्षीप्रमाणे सुसज्जरीत्या संपूर्ण डाॅक्टरांच्या टीमसहित सुरू करणे आवश्यक असताना तुटपुंज्या सुविधा व साधनामुग्रीने जंबो कोविड सेंटर सुरू आहे. महापौर व पुणे मनपाने कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी जे पाच फोन नंबर जाहीर केले आहेत ते नंबर कधीच लागत नाहीत अशा अनेक तक्रारी पुणेकर नागरीक करीत आहेत. त्यामुळे बेड मिळणे अवघड झाले आहे. सत्ताधारी भाजप पुणेकरांची फसवणूक करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. पुणेकरांच्या पैशातून फक्त जाहिराती व पोपटपंची चालू आहे. पुणे महानगरपालिकेने पुणे शहरातील प्रत्येक भागामध्ये पुर्वीप्रमाणे विलगीकरण कक्ष सुरू करावे त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांकडून इतर नागरिकांना कोरोनाचे संक्रमण होणार नाही. त्यामुळे नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होईल.
पुणेकर नागरीकांनी कर स्वरूपात दिलेल्या पैशांचा विनियोग पुणेकरांच्या आरोग्यासाठी वापरणे क्रमप्राप्त असताना पुणे महानगरपालिकेतील सत्ताधार्याकडून मनमानी पध्दतीने चालू असलेली अनावश्यक विकास कामे त्वरित बंद करण्यात यावीत. पुणेकरांच्या पैशांची सत्ताधार्याकडून चाललेली उधळपट्टी थांबवून पुणेकरांचा पैसा पुणेकरांच्या आरोग्यासाठी वापरून पुणेकरांचा जीव वाचवावा. पुणेकरांवरील कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी व कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी सढळ हाताने निधी उपलब्ध करून देण्यात यावा. पुणे महानगरपालिकेमध्ये अनावश्यक विकास कामाचा दिखाऊपणा पूर्णपणे थांबवावा. राज्य शासनाच्या नियमावलीनुसार विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. काही ठिकाणी तर पाच सहा महिन्यापूर्वी करण्यात आलेली विकासकामे पुन्हा पुन्हा तीच कामे करण्यात येत आहेत. त्याकडे म्युनिसिपल अॅक्ट प्रमाणे शासनाचे प्रतिनिधी व प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण पुणे शहरामध्ये विकास कामाच्या नावावर चाललेली लूट त्वरित थांबवावी.असे या निवेदनात म्हटले आहे.

