कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे तर्फे गुरुमहात्म्य आणि लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : दिवसेंदिवस अधिक आत्मकेंद्री होत चाललेल्या आजच्या समाजामध्ये दुस-यांचा विचार करून त्यांचे दु:ख दूर करण्याची वृत्ती अतिशय कमी झाली आहे. अशावेळी सामाजिक काम करणा-या संस्था आणि व्यक्तींमुळे समाजाचा गाडा योग्य रितीने सुरू आहे, अशा समाजकार्य करणा-यांना बळ देण्याची गरज आहे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले
कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तजयंती उत्सवांतर्गत देण्यात येणा-या पुरस्कारांचे वितरण बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अॅड.रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ उपस्थित होते. ट्रस्टचे यंदा १२४ वे वर्ष आहे.
सामाजिक क्षेत्रात फासेपारधी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे पद्मश्री गिरीश प्रभुणे, शैक्षणिक क्षेत्रात मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असलेले डॉ.बी.जी. उर्फ भाऊसाहेब जाधव आणि धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प.पू. सद्गुरु प्रेमल माताजी यांना गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार बालकामगारांसाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूरच्या अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांना प्रदान करण्यात आला. रुपये २५ हजार, सन्मानचिन्ह, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
डॉ.सदानंद मोरे म्हणाले, लोकमान्य टिळक त्यांच्या कार्यामागे दगडूशेठ हलवाई यांनी आपले बळ उभे केले. हाच वसा पुढे नेत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट समाजातील चांगल्या लोकांच्या पाठीशी उभे राहत आहे. या ट्रस्टचा आदर्श इतर व्यक्ती आणि संस्थांनी घेतला पाहिजे.
डॉ.नितीन करमाळकर म्हणाले, विद्यापीठ समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. विद्यापीठ जे काम करू शकत नाही, ते काम या सामाजिक संस्था अतिशय प्रामाणिकपणे आणि पोटतिडकीने करत आहे. अशा संस्थांमुळे ख-या अर्थाने समाज आणि आपला देश पुढे जात आहे.
पुरस्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे म्हणाले, मला पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्या कार्याला राजमान्यता मिळाली. तर लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर तर्फे पुरस्कार मिळाल्यामुळे एक प्रकारे माझ्या कार्याला धर्माची देखील मान्यता मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रेमल माताजी म्हणाल्या, समाजामध्ये सद््भावना आणि माणुसकी कायम जागृत राहावी, या उद्देशाने मी काम करत आहे. ट्रस्टच्या पुरस्कारामुळे मला काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे.
भाऊसाहेब जाधव म्हणाले, गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण सर्वप्रथम देणे, हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे. यामुळे शिक्षण हे आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आह,े हा विचार आम्ही अनेक मुलांमध्ये रुजवू शकलो याचा मला आनंद आहे, असेही ते म्हणाले. अनुराधा भोसले म्हणाल्या, उसतोड कामगार आणि वीट भट्टी कामगारांच्या मुलांची अवस्था पाहिली, तर देश आजही ख-या अर्थाने स्वतंत्र झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचले नाही तर आपला देश भविष्यात विकसित होऊ शकेल का? याचा विचार प्रत्येकाने गांभीर्याने करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
स्वरतीर्थ स्व.सुधीर फडके यांच्या चिरस्मरणीय श्रवणीय गीतांचा बहारदार कार्यक्रम असलेला बाबूजी व मी हा ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके आणि सहका-यांनी सादरीकरण केले. प्रज्ञा देशपांडे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले

