हा तर महाराष्ट्राचा अपमान ! राज्यपालांच्या त्या भेटीवरून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
पुणे-महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदु पुणे आहे. बाळासाहेब ठाकरे होते तो केंद्रबिंदु हा मुंबईत होता. अनेक काळ देशाचे आणि राज्याचे राजकारण मुंबईतून घडत होते. आता सर्व प्रमुख हे पुण्यात असल्याचे विधान संजय राऊतांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवालही राऊतांनी विरोधकांना उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावर आज शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान. मुख्यमंत्री लोकनियुक्त असतात, राज्यपालांना अधिकार नसतात.
राज्यपालांसाठी राजभवन उत्तम जागा आहे त्यांनी आरामात राहावं. त्यांची नियुक्ती केंद्राकडून होते, खर्च राज्य शासन करते. राजभवन राजकारण करण्याची जागा नाही. बाहेर या मैदानात आम्ही राजकारण करू, असे आव्हान खासदार राऊत यांनी राज्यपालांना त्यांचे नाव न घेता दिले.
आता या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे
संजय राऊतांनी पुण्यात बोलताना विरोधकांवर टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारविषयी बोलताना राऊत म्हणाले की, ‘हे सरकार होणारच होते. हे सरकार होणार नाही असे काहींना वाटत होते, मात्र माझ्यासारख्या काही लोकांना सरकार अशा प्रकारे घडेल असे वाटत होते आणि तसेच झाले. नंतर हे सरकार 15 दिवसांत कोसळेल अशाही काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. पण सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार पूर्ण ताकदीने चालले आहे आणि सरकार पाच वर्ष टीकेल’ असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
पवारांचा सल्ला घेतला तर पोटदुखी का होते?
मुख्यमंत्री काही करत नाही शरद पवार हे सरकार चालवतात असे विरोधकांकडून अनेकदा बोलले जाते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘शिवसेना- भाजप युतीचे सरकार होते तेव्हा देखील बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवत असल्याचा आरोप केला जात होता. जेव्हा तीन पक्षांचे सरकार असते, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी देखील इतर राज्यांना मार्गदर्शन, सल्ला देत असतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवालही राऊतांनी विरोधकांना विचारला आहे.
राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला
नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये वाढिव वीज बिल आणि दुधाच्या दरांचा प्रश्न त्यांनी मांडला. दरम्यान राज्यपालांनी त्यांना शरद पवारांशी बोलून घेण्याचा सल्ला दिला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपचे बहुतेक नेते शरद पवारांना नेता मानतात आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे. असे म्हणत राऊतांनी राज्यपालांना खोचक टोला लगावला आहे

