पुणे- स्वतः डीएसके यांनी आपल्या शब्दात आपल्या ठेवीदारांना केलेले आवाहन …
ठेवीदारांनो, मी सर्वांचे पैसे परत देणार आहे
माननीय कोर्टाच्या आदेशाने लवकरच मी सर्वांचे पैसे परत देण्यास सुरूवात करणार आहे. यामध्ये ज्यांनी माझ्या विरूध्द तक्रार केली व ज्यांनी तक्रार केली नाहीअशा सर्वच ठेवीदारांचे पैसे मी देणार आहे. परंतु तरीही काही दुष्ट माणसं, ठेवीदारांना भीती घालत आहेत. “पोलीसात तक्रार करणार्यांचेच पैसे मिळणार आहेत” असे सांगून ठेवीदारांना भयभीत करून, पोलीसात तक्रार करण्यास भाग पाडत आहेत. परंतु यात काही तथ्य नाही. यासाठीच या निवेदनाद्वारे मी सर्व ठेवीदारांना आवाहन करतो की तुम्ही कृपया घाबरून जाऊ नका. तुमचे सर्वांचे पैसे मा. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे परत देण्यास लवकरच सुरूवात होईल. या दुष्ट लोकांचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे डीएसके संपविणे. यासाठीच कधी ठेवीदार तर कधी फ्लॅटधारक तर कधी अन्य कोणी, यांना चिथावून ते मला अधिक अडचणीत आणत आहेत. तुमचे पैसे देण्यासाठी प्रॉपर्ट्या विकायला गेलो तर तिथेही हे लोक काड्या करतात. मीडियाच्या मदतीनं माझ्याबद्दल इतकं मत गढूळ करून ठेवलंय की पैसे देण्यासाठी पुढे आलेला फायनान्सरही घाबरून मागे सरतो. मग पैसे येणार तरी कसे? तरीही मित्रांनो, आजपर्यंतच्या प्रकरणांना मी खंबीरपणे तोंड देत आहे. पण निदान यापुढे तरी तुम्ही या दुष्टांच्या डावपेचांना बळी पडू नका. तुम्हीच सांगा, सारखं कोर्टकचेर्या, रोज नवीन अफवा, पोलीस चौकश्या या सगळ्यात मी गुंतून राहिलो तर पुढे काम करणार तरी कसं? परिस्थिती सुधारणार तरी कशी? आत्तापर्यंत या सर्व दुष्टांशी लढत, धडपडत मी लवकरच डीएसके समूह पूर्वपदावर आणत आहे. हे या दुष्टांच्या लक्षात आल्यामुळेच ते आता ही कुटील खेळी खेळत आहेत. परंतु आपण या कट-कारस्थानाला बळी पडलात तर या दुष्टांचा विजय होईल. तेव्हा माझं तुम्हा सर्वांना हात जोडून एकच सांगणं आहे की, यापुढे कृपया मला कोर्टकचेर्यांमध्ये गुंतवून ठेवू नका. कोणाही दुष्टाच्या बहकाव्यात येऊ नका. या लोकांना तुम्हां ठेवीदारांचे काय होईल याची किंचितही पर्वा नाही. त्यांना फक्त तुमचा वापर करून, मला आयुष्यातून उठवायचंय. पण हा डाव तुम्ही उधळून लावा. तुमच्यातलेच 3000 हजार ठेवीदार माझ्या पाठीशी उभे राहिलेत. “डीएसके, आम्हांला चालतील 12 हप्त्यात पैसे. पण तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडा” असं म्हणत या लोकांनी अॉफिसला येऊन फॉर्मवर सह्या देखील केल्या आहेत. असा पाठिंबा देणार्या ठेवीदारांची संख्या रोज वाढत आहे. हे पाहून या दुष्ट लोकांचा पोटशूळ आणखीनच वाढला आहे. तेव्हा मी तुम्हांलाही हेच सांगेन की माझ्यावर असलेला विश्वास तुम्हीही कायम ठेवा. या लढाईत माझ्या विरूध्द नाही तर बाजूने उभे राहा हेच कळकळीचे सांगणे !
डीएसके
मला संपविण्यासाठी दुष्टांचे डावपेच -कट-कारस्थानाला बळी पडू नका -मला साथ द्या -डीएसके
Date:

