पुणे :- परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करून जिद्दी ने यश मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा. यापुढे शिक्षणाची काठीण्य पातळी वाढत जाते. त्यामुळे घोकंमपट्टी न करता विषयाचा पाया समजून घेऊन व अभ्यासाची पध्दत नव्यानं आखून ज्ञानार्जन करण्याकडे भर द्या.
डी. एस. कुलकर्णी फाऊंडेशनच्या वतीने दहावीच्या परिक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी वेलणकर बोलत होते. यावेळी डी. एस. कुलकर्णी फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के, अ. ल. देशमुख, अॅड.प्रमोद आडकर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, यशाच्या मागे न धावता स्वतःमधील क्षमतांचा अत्युच्च विकास साधल्यास यश आपोआप मिळते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा, काय शिकलो यापेक्षा किती ज्ञान मिळवले याकडे तुमचा कल असु द्या.
दहावी नंतरचे शिक्षण अवघड होत जातं, त्यामुळे आत्मविश्वासाने प्रयत्न करून तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. देशाला वैज्ञानिकांची नितांत आवश्यकता आहे. या क्षेत्रात कारकीर्द करा, असे मार्गदर्शन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले.
तसेच किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजेनेची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. आडकरांनी पुढील वाटचालीसाठी विविध कथा व उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला.
यावेळी यशाला गवसणी घालणाऱ्या विविध शाळेतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम भुर्के यांनी केले.

