पुणे –
राज्याचे कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज पुण्यातील शिवभोजन केंद्रांना भेटी दिल्या.
त्याचप्रमाणे सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य प्रकारे होत आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी काही रेशनधान्य विक्री केंद्रांना देखील भेटी दिल्या.
१)स्वामी समर्थ स्नॅक्स – फॅमिली कोर्ट शिवाजीनगर
२) ग्रिन पॅलेस रेस्टॉरंट-महात्मा फुले मंडई ९९४ बुधवार पेठ
३) श्री स्वामी समर्थ कृपा स्नॅक्स-१६३ बुधवार पेठ फारासखाना जवळ
४)साईलिला भोजनालय – कात्रज कॉर्नर कात्रज आदी ठिकाणी भेटी देऊन त्यांनी केंद्र चालक रेशन दुकानदार आणि नागरिकांशी संवाद साधला. या वेळी सोशल डिस्टन्स ची खबरदारी आवर्जून घेण्यात आली. तसेच कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही आदरणीय कदम साहेबांनी नागरिकांना दिल्या.
कोरुना संसर्गामुळे सर्वसामान्य नागरिकांना लॉक डाऊन परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सतर्कतेने लक्ष देत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार होऊ न देण्यासाठी देखरेख ठेवण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात जीवनावश्यक वस्तुंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नसून जादा दराने वस्तु विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

संचारबंदीच्या काळात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोर व्हावी, असेही ते म्हणाले.
संचारबंदीच्या काळात अन्नधान्याचा काळाबाजार होण्याची शक्यता असते. यंत्रणेनी याबाबत दक्षता घेणे आवश्यक असून याबाबत नागरिकांकडून तक्रारी येवू नयेत. मे व जूनच्या नियतनाबाबत शासनातर्फे लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच केशरी व पांढरे कार्ड नसणाऱ्या व्यक्तींना देखील रेशन देण्याबाबत शासन निर्णय लवकरच काढण्यात येईल,असे कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

