पुणे : सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांना सन्मानित करण्याचा जनकल्याण समितीचा उपक्रम खूप आनंददायी आहे. या प्रयोगशीलतेमुळे अनेक कार्यकर्ते आणि यांची सामाजिक कामे समाजापुढे येतील, असा विश्वास डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी व्यक्त केला .
रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त समाजसेवेचे कार्य करत असलेल्या पन्नास व्यक्ती आणि संस्थांना या वर्षात कृतज्ञता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ डॉ. वाचासुंदर यांना पुरस्कार प्रदान करून करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात स्व- रूपवर्धिनी संस्थेच्या जेष्ठ कार्यकर्त्या पुष्पाताई नडे यांनाही सन्मानित करण्यात आले.
समितीचे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांच्या हस्ते डॉ. वाचासुंदर आणि नडे यांचा सन्मान करण्यात आला. समितीचे कार्यवाह तुकाराम नाईक, सहकार्यवाह विनायक डंबिर, सदस्य राजन गोऱ्हे आणि संघटनमंत्री शरद खाडिलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. वाचासुंदर गेली अनेक वर्षे कर्णबधिरांसाठी काम करत असून त्यांनी स्थापन केलेल्या कॉक्लिया, पुणे या संस्थेतर्फे जन्मजात कर्णबधिर मुलांना बोलते करण्याचे काम केले जाते.
पुष्पाताई नडे गेली अनेक वर्षे स्व- रूपवर्धिनी संस्थेचे काम करत आहेत. संस्थेतर्फे सुरु करण्यात येणार असलेल्या नर्सिंग कॉलेज संबंधीची माहिती त्यांनी यावेळी दिली. महिलांच्या स्वयंरोजगारासाठीही त्या काम करत आहेत.
समितीतर्फे हितचिंतकांच्या स्नेहमेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते, रा.स्व. संघाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोकराव कुकडे , श्री. सुहासराव हिरेमठ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. वाचासुंदर, पुष्पाताई नडे कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित.
Date:

