इस्तांबुल (टर्की) येथील आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ः महिलांच्या ५७ किलो गटात (खुल्या) कामगिरी
पुणे : इस्तांबुल (टर्की) येथे सुरू असलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी चार सुवर्णपदक पटकाविले. ३८ वर्षीय डॉ. शर्वरी यांनी महिलांच्या ५७ किलो गटात (खुल्या) कजाकिस्तान वर मात करत ही कामगिरी केली. त्यांनी स्क्वॅटमध्ये १३० किलो वजन उलचून अव्वल क्रमांक पटकावला. यानंतर बेंच प्रेसमध्ये ७० किलो वजन उचलून बाजी मारली. डेडलिफ्टमध्ये १५० किलो आणि एकूण ३५० किलोसह सुवर्णयश मिळवले.
यापूर्वी गोव्यातील मडगाव येथील श्री मनोहर पर्रिकर इन्डोअर स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ५७ किलो गटात ब्रेंच प्रेसमध्ये ७० किलो उचलून सुवर्णपदक पटकाविले होते. या स्पर्धेतूनच त्यांची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली होती. डॉ. इनामदार या त्यांचे पती वैभव इनामदार यांच्या सोबत सराव करतात. तसेच आहार आणि व्यायाम कसा असावा याची तयारी त्या स्वतःच करतात.
डॉ. शर्वरी इनामदार म्हणाल्या, ‘आशियाई स्पर्धेसाठी भरपूर मेहनत केली होती. मागील तीन वर्षे कसून सराव केल्यानंतर मिळालेल्या मेहनतीचे हे फळ आहे. सामान्य महिला देखील आपल्या व्यवसाय आणि घर सांभाळून आवडत्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतात. त्यामुळे महिलांनी मर्यादित न राहता स्वतःच्या क्षमता जाणून घेऊन पुढे यावे.’
वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक मिळवणाऱ्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये देखील स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कुटुंबातील दैनंदिन कामे, रुग्णांची देखभाल अशा रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून त्यांनी सलग चार वेळा ‘स्ट्राँग वूमन’ हा किताब जिंकला आहे. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले आहे. शिवाय २०१८मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकले आहे.