पुणे, ता. ७ : खर्या इतिहासाची ओळख, भारतीय परंपरांचा अभिमान बाळगणे आणि वैचारिक गुलामगिरीतून मुक्तता हे परिवर्तनाचे सूत्र असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
डॉ. श्रीपती शास्त्री ‘रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्ससेस’ या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्राच्या कार्यालयाचे सहकारनगर येथे उद्घटान करताना जावडेकर बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष नितीन देशपांडे, सचिव डॉ. शरद खरे, सहसचिव अविनाश नाईक, संचालक बाबासाहेब शिंदे, सागर नेवसे, सुधीर गाडे, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, काशिनाथ देवधर, हरी मिरासदार, थॉमस डाबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर पुढे म्हणाले, ‘‘सध्या दोन ‘नरेटिव्ह’मध्ये स्पर्धा सुरू आहे. ब्रिटिश व मुघल मानसिकतेतून घडवलेला नरेटिव्ह संपवून राष्ट्र प्रथम माणणारा संवाद चालला पाहिजे. त्यासाठी खरा इतिहास सांगण्याची आवश्यकता आहे. खरा इतिहास सांगण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे.’’
डॉ. शरद खरे यांनी प्रास्ताविक, काशिनाथ देवधर यांनी स्वागत, नितिन देशपांडे यांनी परिचय, अविनाश नाईक यांनी सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन केले.