मुरलीधर मोहोळ, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर यांचा जाहीर सत्कार
पुणे : “समाजातील कित्येक समस्या सोडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य लोकांची ताकद बनले. आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचा प्रेरणादायी विचार त्यांनी समाजाला दिला. त्यामुळे डॉ. आंबेडकर एका विशिष्ट जातीपुर्ते मर्यादित न राहता, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे’ आहेत, हा विचार समाजात रुजवण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे,” असे माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी व्यक्त केले.
संंविधान सन्मान समिती, आंबेडकरी पक्ष-संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भुमिपुजन तसेच प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात पुढाकार घेऊन त्याची पुर्तता करणारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार होते. यावेळी ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, सभागृह नेते गणेश बीडकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. विजय खरे, नगरसेविका फरझाना शेख, आंबेडकरी नेते राहुल डंबाळे, ‘रिपाइं’चे ऍड. मंदार जोशी, महिला नेत्या संगीता आठवले, शशिकला वाघमारे आदी उपस्थित होते.
अविनाश महातेकर म्हणाले, “अस्पृश्यतेच्या जोखडातून समाजाला बाहेर काढत समाज घडवण्यासाठी बाबासाहेबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिल्यानंतर ही त्यांचे नेतृत्व स्विकारण्यास विलंब झाला. अनेक अरिष्ठ परंपरा विरोधात बाबासाहेब अविरत लढले. समाजातील सामान्य घटकांना न्याय मिळवून देण्याची त्यांची प्रमाणिक भुमिका होती. जागतिक पातळीवर सर्वात जास्त आंबेडकर यांची स्मारके उभारण्यात आली आहेत. मात्र आता पुढच्या पिढीमध्ये त्यांचे विचार पेरणे ही तितकेच गरजेचे आहे.”
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंबेडकरांचा पुतळा उभारणे हा ऐतिहासिक क्षण आहे. समाजात आंबेडकरी पुतळ्यांना विरोध का होतो, हेच कळत नाही. सिम्बायोसिसजवळ उभारलेल्या आंबेडकर स्मारकावेळी आम्हालाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. आंबेडकर फक्त महामानव न राहता ते विश्वमानव कसे होतील, याचा विचार आपण केला पाहिजे. समाजातील अज्ञान, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे.”
परशुराम वाडेकर म्हणाले, “लहानांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करत आलो आहे. आंबेडकरांबद्दल कृतज्ञता म्हणून सर्वांच्या साथीने ५० वर्षानंतर का होईना महानगरपालिकेत बाबासाहेबांचा पुतळा बसला, याचा आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले आणि डॉ. आंबेडकर या महापुरुषांचे पुतळे असणारी ही एकमेव पालिका असणार आहे. ज्या पालिकेने बाबासाहेबांना मानपत्र देण्यास नकार दिला, त्याच पालिकेत बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यात आला आणि ही ऐतिहासिक घटना आमच्या हातून घडली, याचा आनंद आहे.”
राहुल डंबाळे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. बाळासाहेब जानराव, डॉ. विजय खरे, गणेश बिडकर यांनीही मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचालन दिपक मस्के यांनी केले. आभार शैलेंद्र चव्हाण यांनी मानले.

