पुणे – कोरोना टेस्ट चा रिपोर्ट येईपर्यंत उपचार नाही ,आणि रेमडेसीवर ची जबाबदारी घेत असाल तरच हॉस्पिटलमध्ये दाखल करवून घेऊ अशी पद्धती काही रुग्णालयांनी सुरु केल्याने महापालिकेतील विपक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी संताप व्यक्त केला आहे . आणि याबाबत महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. अशा जाचक अटी घालून उपचार टाळण्याचे प्रकार होऊ नयेत या साठी महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना सहाय्य करावे असे त्यांनी म्हटले आहे .
शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालयात जागा उपलब्ध होत नाहीत. महापालिकेने खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस ताब्यात घेतले असून या माध्यमातून रूग्णांना वेळेत बेड उपलब्ध करणारी यंत्रणा सक्षमपणे काम करीत नाहीत असे स्पष्ट निदर्शनास येत असून यामुळे रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होतात. रुग्णांचे नातेवाईक रूग्णास हॉस्पिटलमध्ये प्रचंड धावपळ करून जागा मिळवतात व जागा उपलब्ध झालेनंतर रुग्णास व त्यांच्या नातेवाईकांस रेमडिसिवीर इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर रुग्णालयात दाखल केले जाईल असे सांगितले जाते.
वास्तविक रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा प्रचंड प्रमाणात असून रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन मिळविण्यासाठी धडपत करत असतात, अशी संपूर्ण शहरात परिस्थिती आहे. रुग्णांचे नातेवाईकांना इंजेक्शन मिळणेचा कालावधी याबाबत काही स्पष्टता नसते. परंतू इंजेक्शन रूग्णालयाकडे शासनाकडून पुरविले जात असून मागणी जास्त असल्याने रुग्णालयांकडून रेमडिसिवीर इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर रुग्णालयात दाखल केले जाईल असे सांगितले जाते.
पुणे महापालिकेचे रूणालय व खाजगी रुग्णालयांना रेमडिसिवीर इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर रूग्णालयात दाखल केले जाईल असे न सांगता रूग्णांना तातडीने दाखल करून त्यांचेवर उपचार चालू करणे ही त्यांची कायदयाने जबाबदारी आहे. रेमडिसिवीर इंजेक्शन रुग्णालयास देखील वेळोवेळी मिळणार असून त्यामधून ते उपचार करतात. तसेच नातेवाईक देखील इतर ठिकाणाहून इंजेक्शन आणून देतात, परंतू यासाठी कालावधी जातो, तोपर्यंत एखादया रूग्णास दाखल केले नाही व त्यावर उपचार चालू केले नाही तर सदर रूग्ण अत्यवस्थ होवू शकतो ही बाब लक्षात घेवून आपणामार्फत पुणे महापालिकेचे रूणालय व खाजगी रुग्णालयांना रेमडिसिवीर इंजेक्शनची जबाबदारी घेत असाल तर रुग्णालयात दाखल केले जाईल असे न सांगता रुग्णांना तातडीने दाखल करून त्यांचेवर उपचार चालू करणेबाबत आदेश दयावेत,
अॅडमिशनसाठी कोरोना टेस्ट रिपोर्ट ची अट अन्यायकारक
विपक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी असेही म्हटले आहे कि,’ एखादा रूग्ण अचानक अत्यवस्थ होवून त्यांचे कुटुंबिय घाबरून जातात, बीपी व शुगर सारखे आजार असणारे अनेक रुग्णांना अचानक रात्री अपरात्री त्रास होवू लागतो, असे रुग्ण रूग्णालयात उपचारासाठी गेले असता रुग्णालयाच्या स्टाफकडून त्यांना सर्वप्रथम कोरोना तपासणीचा अहवाल मागितला जातो. अशा वेळी रूग्णाकडे व त्यांच्या नातेवाईकांकडे कोरोना तपासणी केली नसल्याने अहवाल नसतो, कोरोनाच्या अहवालाशिवाय त्यांचेवर उपचार करता येणार नाही असे रुग्णालयाने सांगितल्यावर रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची मानसिक स्थिती ढासाळून त्याठिकाणी वादाचे प्रसंग घडतात. तसेच काही रुग्ण हे या तणावात येवून त्यांचे बीपी व शुगर प्रचंड वाढून एखादया रुग्णाचा जीव जावू शकतो. अशा वेळी या रुग्णाच्या मृत्युची जबाबदारी कोणाची असा उदविग्ण प्रश्न विचारले जातात. सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली असता सदर रूग्णावर वेळेत उपचार चालू केले असता त्याचा जीव वाचू शकतो ही बाब लक्षात घ्यावी.
तरी आपल्या स्तरावरून पुणे महापालिकेचे रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्यास आलेले अत्यवस्थ रूग्णांवर तातडीने कोरोनाची तपासणी अहवाल नसेल तरी उपचार करणेबाबत आदेश पारित करावेत, ही नम्र विनंती. सदर विषय अत्यंत महत्वाचा असल्याने आपण जातीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आयुक्तांकडे धुमाळ यांनी केली आहे.

