मुंबई/पुणे /पणजी –भाजपा सोबत कोणती आणि किती मंत्रिपदे याबाबत चर्चा झालेली नाही ,लवकरच होईल तोवर मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.महाराष्ट्रात आज होणारी फ्लोअर टेस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर टळलेली आहे. यानंतर नव्याने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. शिंदे गटाचा मुक्काम गोव्यात आहे. तर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेने सत्तास्थापनेच्या वाटाघाटींसाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे, भाजप नेतेही आज दुपारी 3 वाजता राजभवनावर जाणार असल्याची चर्चा आहे.
- शिंदे गटाची गोव्यातील हॉटेलमध्ये बैठक संपली.
- बैठकीनंतर गोव्याहून एकनाथ शिंदे एकटेच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. विमानाने ते मुंबईला येणार आहेत.
कालपासून गोवा मुक्कामी बंडखोर आमदार
कालच गुवाहाटीहून गोव्यात दाखल झालेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबतच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत भाजपसोबत सत्तास्थापनेवर खलबतं झाली. बैठक संपताच शिंदे इतर आमदारांना गोव्यातच सोडून स्वत: एकटेच मुंबईला गेले. आजच शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे त्यांनी म्हटले. यासंदर्भात त्यांनी सलग दोन ट्विट केले. बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेसोबत घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

