ठाणे : डोंबिवली एमआयडीसी मधील प्रोबेस या कंपनीत आज झालेल्या मोठ्या स्फोटाची सखोल चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी या स्फोटाची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडून घेतली. १५० हून जास्त जण जखमी आणि ४ मृत्यू या दुर्घटनेत झाले होते. तसेच अनेक घरांचे नुकसानही झाले होते. दुपारी मुख्यमंत्री मुंबईहून रस्ता मार्गे थेट डोंबिवलीत पोहचले. त्यांनी प्रथम मिलापनगर भागातील एम्स रुग्णालयात जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली तसेच नातेवाईकांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. एनडीआरएफचे जवान मदतकार्य करीत आहेत त्यांचाशीही चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.
२४ तास मदतकार्य सुरु राहणार- जिल्हाधिकारी
स्फोटाची तीव्रता लक्षात घेऊन तसेच अद्यापही पडलेल्या इमारतींचा ढिगारा आणि त्याखाली काही व्यक्ती असण्याची शक्यता लक्षात घेऊन मदतकार्य २४ तास सुरु राहिल, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी विकास गजरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार तसेच इतर कर्मचाऱ्यांचे पथक शिफ्ट्समध्ये काम करणार असून डोंबिवलीतील रुग्णालयांमध्ये देखील मदतीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय या मदतकार्यात स्वयंसेवी संस्था, होमगार्ड्स तसेच सामाजिक काम करणाऱ्या संस्थांची मदतही घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.