औरंगाबाद दि. २१ ऑगस्ट- महाविकास आघाडी सरकारने जन आशीर्वाद यात्रेवर टीका करण्यापेक्षा आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे आधी तपासावे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतर्गत गर्दीमध्ये कार्यक्रम होत आहेत हे यांना चालतात, पण आम्ही काही केले की टीका करायला यांच्याकडून बोटे वर केली जातात. एक बोट आमच्या दिशेने दाखवत असाल तर इतर बोटे तुमच्या दिशेने आहेत याचा विसर पडू देऊ नका, अशी टीका विधान परिषद विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची औरंगाबादमध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू असून या यात्रेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यावेळी माध्यमांसोबत बोलताना दरेकर म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रेमुळे महाराष्ट्र भाजपमय झाले आहे. याकारणाने आघाडी सरकार भांबावले व भयभीत झाले असून कोणत्याही विषयावर भाजपवर आरोप करण्यात वेळ घालवत आहे. आम्ही कार्यक्रम केले की कोरोना वाढतो आणि कोरोनाचे नियम यांना आठवतात. दुसऱ्यांकडे बोट दाखवताना स्वतःखाली काय जळतंय हे यांना दिसत नाही का? जेव्हा राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाचे विविध कार्यक्रम होतात, तेव्हा कोरोना नसतो. नेमका आमच्या वेळी कोरोना होतो का? जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आघाडी भयभीत झाली आहे. त्यामुळे हे आरोप होत असल्याचा टोला दरेकर यांनी लगावला.
दरेकर म्हणाले की, कोरोना असतानाही निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करत आहे. असे असताना भाजप २४ तास निवडणुकांना समोरे जायला तयार आहे. महाविकास आघाडी सरकारची अवस्था संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे जनताच काय तो निकाल लावेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसोबत युती करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नसून तसा विचारही करण्यात आलेला नाही. भाजपसोबत मनसे पदाधिकारी येत असतील तर ती महाराष्ट्राच्या हिताची बाब असून हे स्वागतार्ह असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
दुसऱ्यांकडे बोट दाखवताना स्वतःखाली काय जळतंय हे महाविकास आघाडीला दिसत नाही का? प्रविण दरेकर यांची टीका
Date:

