पुणे- सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर रुंद करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी आणि काही नागरिकांनी घेतलेल्या पवित्र्याला कडाडून आक्षेप घेत आता भाजपचे नगरसेवक महेश वाबळे त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत .साप साप म्हणून भूई थोपटने बंद करा, रुंदीकरणाबाबत सहकार नगर, संभाजीनगर, पर्वती येथील नागरिकांची दिशाभूल करु नका असे जाहीर आव्हान त्यांनी केले आहे.
या संदर्भात वाबळे यांनी असेही म्हटले आहे कि, मी स्वतः नगर अभियंता प्रशांत वाघमारे व महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना नगरसेवक रघुनाथ गौडा,भिमराव साठे यांच्या समावेत प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती समजावून सांगितली आहे. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता निर्धास्त रहावे .सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर रुंद करण्याच्या निर्णयानंतर सहकारनगर, पर्वती भागातील रहीवाश्यांना नाेटीसा बजावण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली असल्याची अफवा पसरवून तथाकथित मंडळी नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या मंडळींचा असून हा डाव हाणून पाडणार आहे.
संभाजीनगर, क्रांती सोसायटी, सावरकर सोसायटी व परिसर हा पुनर्वसन प्रकल्पातील भाग असून या भागासाठी वरील नियम लागू होत नाही.
नुकतेच स्थायी समितीने शहरातील सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. मात्र हा निर्णय शहरातील मध्य पेठांसाठीचा आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील नागरिकांनी भिती बाळगण्याचे कारण नाही. रस्त्यालगत राहणाऱ्या रहीवाश्यांना त्यांची जागा जाणार, घरावर बुलडाेझर फिरविला जाणार हा अपप्रचार असून नागरिकांनी कृपया चिंता बाळगू नये.असेही वाबळे यांनी म्हटले आहे.

