बावनकशी व्‍यंगचित्रांचे धनी ज्ञानेश सोनार

Date:

 

व्‍यंगचित्रकला आणि चित्रकला क्षेत्रात आघाडीवर असलेलं नाव म्‍हणजे ज्ञानेश सोनार.  ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’ या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्‍या संस्‍थेच्‍यावतीने सोनार यांना शनिवार, दिनांक 13 एप्रिल रोजी नाशिक येथे जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येत आहे. दिवाळी अंकांतील जादूई खिडक्‍यांचे अनभिषिक्‍त सम्राट असलेल्‍या सोनारांनी मराठीतील लोकप्रिय दिवाळी अंकासह हिंदी,इंग्रजीतही आतापर्यंत 80 हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे रेखाटली आहेत.

            ज्ञानेश सोनार यांचा जन्‍म 1 मार्च 1944 रोजी झाला. त्‍यांचे बालपण आणि शिक्षण नाशिक येथेच झाले. न्‍यू हायस्‍कूलमध्‍ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेतून मेकॅनिकल ड्राफ्टसमनचा अभ्‍यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ओझर येथे  मिग विमान बनवणा-या ‘हिंदुस्‍थान एरोनॉटीक्‍स’मध्‍ये अधिकारी म्‍हणून सोळा-सतरा वर्षे सेवा केली. दरम्‍यान, 1964-65 च्‍या सुमारास पुण्‍याच्‍या ‘स्‍वराज्‍य’मध्‍ये त्‍यांचे व्‍यंगचित्र छापून आले. त्‍यानंतर अधून-मधून वर्तमानपत्रे, नियतकालिके,विविध दिवाळी अंकांत त्‍यांची व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द होत होती. 1970च्‍या सुमारास त्‍यांनी मोठी झेप घेतली. मराठीतील नामवंत दिवाळी अंकात त्‍यांची व्‍यंगचित्रे झळकून रसिकांचे मनोरंजन करु लागली. त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांचे विषयही नावीन्‍यपूर्ण असत. खिडकी चित्रे पहातांना अनेक वाचकांनी खळाळून हसण्‍याचा आनंद मिळवला आहे. लेखकांपेक्षा जास्‍त मानधन घेणा-या व्‍यंगचित्रकारांमध्‍ये ते आघाडीवर होते.    विनोदी व्‍यंगचित्रांप्रमाणेच त्‍यांनी सामाजिक आणि राजकीय व्‍यंगचित्रेही रेखाटली. समाजाच्‍या विविध क्षेत्रातील खोटारडेपणावर आपल्‍या ब्रशचे फटकारे मारलेत.

             मला आठवते, नांदगावला (रेल्‍वे स्‍टेशन) 1979 -80 च्‍या सुमारास असतांना आम्‍ही मध्‍य रेल्‍वेच्‍या लायब्ररीत आणि लोकमान्‍य वाचनालयात वाचायला जायचो. शालेय विद्यार्थी असल्‍याने ग्रंथपाल आवाज, जत्रा सारखे दिवाळी अंक वाचायला तर दूरच, पहायलाही देत नसे. अशावेळी ज्‍याच्‍या हातात हे अंक असतील त्‍याच्‍यामागे गुपचूप उभे राहून ज्ञानेश सोनार यांच्‍या जादूई खिडकी चित्रांचा आनंद चोरुन का होईना लुटायचो. महाविद्यालयात गेल्‍यानंतर वयोमानाप्रमाणे थोडी समज वाढली. व्‍यंगचित्रांतील मार्मिकता, मिश्किलपणा, बोचरेपणा कळायला लागला.  मी आणि माझा मित्र राजेंद्रकुमार भिमकर आम्‍हा दोघांना वाचनाची गोडी. दिवाळी अंक म्‍हणजे आनंदाची पर्वणीच असायची. त्यावेळी अंक घरी दिले जात नसत. ग्रंथालयात जाऊनच वाचावे लागायचे. ‘आवाज’,‘जत्रा’ आणि ‘मार्मिक’ या अंकाना वाचकांची अधिक मागणी असायची. अशावेळी ग्रंथालय उघडण्‍यापूर्वीच दारात जाऊन उभे रहायचे आणि आपला आवडता अंक घ्‍यायचा, ही आमची कार्यपध्‍दती. आवाज, जत्रामधील  ज्ञानेश सोनारांसह विविध व्‍यंगचित्रांवर आम्‍ही चर्चा करायचो. एखाद्या व्‍यंगचित्रातील विनोद कळला नाही तर थोडक्‍यात,विनोदबुध्‍दीचा वापर करावा लागला तर त्‍याला आम्‍ही ‘सस्‍पेन्‍स कार्टून’ म्‍हणायचो. ज्ञानेश सोनार यांच्‍या खिडकी चित्रातील दुस-या पानावर काय असेल, यावरही आम्‍ही आमच्‍या बुध्‍दीप्रमाणे विचार करायचो. पण अनेकदा आम्‍ही चुकायचो. दुसरे पान उघडले की त्‍यावरील गुपित पाहून हसून-हसून मुरकुंडी वळायची.‘चावट चित्रे’ काय पहातात रे, असा एखादा वयस्‍कर वाचक म्‍हणायचाही.. पण आम्‍ही त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करायचो. दुस-या वेळेस हाच वाचक याच व्‍यंगचित्रांना पाहून खुदूखुदू हसतांना दिसायचा, हा भाग वेगळा. ज्ञानेश सोनारांच्‍या हास्‍यचित्रांसाठी दर आठवड्याला ‘रविवारची  जत्रा’ची खास वाट पहायचो.  एवढंच नाही तर सोनारांसाठी आम्‍ही जुने दिवाळी अंक मिळवून वाचून काढले.

            माझे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण नाशिक जिल्‍ह्यातील नांदगावलाच झाले. तेव्‍हा करमणुकीची साधने फार नव्‍हती. वाचन हे त्‍यातल्या त्‍यात स्‍वस्‍तातील साधन. रेडिओ ऐकण्‍यावर मर्यादा, चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहाण्‍यासाठी आर्थिक मर्यादा,टीव्‍ही अजून यायचा होता. त्‍यामुळे वाचनावरच अधिक भर. ज्ञानेश सोनार यांची दैनिक गांवकरीमधील  ‘आरसा’ ही दैनंदिन व्‍यंगचित्रे आणि ‘मोटूमामा’ ही मालिकाही मनोरंजक आणि मार्मिक विचार देऊन जायची. दिवाळी अंकातील व्‍यंगचित्रात जे सौंदर्य असायचे, तेच सौंदर्य दैनंदिन व्‍यंगचित्रातही दिसायचे. थोडक्‍यात, ज्ञानेश सोनार यांनी कलेबाबत कुठलीही तडजोड केलेली दिसत नव्हती. मी कामानिमित्‍त अनेकदा नाशिकला यायचो. व्‍यंगचित्रांचा चहाता म्‍हणून त्‍यांना भेटावेसे वाटायचे, पण हिंमत होत नव्‍हती. एवढा मोठा कलाकार भेटेन की नाही, ही शंकाही होतीच. पुढे मी 1989 ला औरंगाबादला गेल्यावर कामाच्‍या व्‍यापात प्रत्‍यक्ष भेट घ्‍यायची राहूनच गेली. पण विविध दिवाळी अंकांच्‍या माध्‍यमातून त्‍यांची व्‍यंगचित्रे पूर्वीप्रमाणेच हास्‍यानंद देत होती. पुढे 2009 मध्‍ये दिवाळी अंकाच्‍या संपादकांच्‍या संमेलनात पुण्‍याला भेट झाली. त्‍यांचा स्‍पष्‍टवक्‍तेपणा जाणवला. मनात एक आणि ओठावर दुसरे असं त्‍यांना जमतच नाही. दिवाळी अंकांचे संपादक आणि व्‍यंगचित्रांबाबतचे अनुभव त्‍यांनी कोणताही आडपडदा न ठेवता सांगितले. ज्ञानेश सोनार यांच्‍याशी तेव्‍हापासून जो स्‍नेह जुळला तो आजतागायत कायम आहे.

            ज्ञानेश सोनार यांच्‍या वैवाहिक जीवनाला नुकतीच 51 वर्षे पूर्ण झाली. पत्‍नी सौ. अनुराधा, मुलगा डॉ. सुनील,स्‍नुषा सारिका, मुलगी अंजली, जावई दुर्गेश चित्‍ते आणि नातवंड असे आनंदी व समाधानी परिवार आणि जीवन लाभलेल्‍या ज्ञानेश सोनार यांनी चित्रकलेप्रमाणेच लेखन क्षेत्रातही उत्‍तुंग भरारी घेतली आहे. ‘चंदनदाह’, ‘फॅन्‍स्‍टॅटिका’, ‘ऑथेल्‍लोचा मृत्‍यू’ हे कथासंग्रह त्‍याचे उत्‍तम उदाहरण ठरावे. ‘चंदनदाह’मधील काही कथांवर तर चित्रपट निर्माण होऊ शकतो, इतक्‍या त्‍या सशक्‍त, दृश्‍यमान आणि अर्थपूर्ण आहेत. त्‍यांच्‍या कथासंग्रहातील भाषा त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांतील रेषांप्रमाणेच लालित्‍यपूर्ण,प्रवाही आणि वाचकांच्‍या मनाला गुदगुल्या करणारी आहे. त्‍यांची ‘मस्‍त हसा’, ‘चंदेरी हास्‍य’, ‘मोटूमामा’ ही व्‍यंगचित्रसंग्रह असलेली पुस्‍तके, ‘तेजस्‍वीनी’(बालकादंबरी संग्रह), इंग्रजीतील ‘डिफरंट स्‍ट्रोक्‍स’, ‘पेंटीग्‍ज बाय ज्ञानेश सोनार’, ‘मामू द मडलर’ (कॉमिक बुक), ‘कार्टून वर्कशॉप’(लहान मुलांसाठी)  ही पुस्‍तके लोकप्रिय आहेत. ‘तिरक्‍या रेषा-हसरे बाण’ हा त्‍यांचा व्‍यंगचित्रांचा कार्यक्रम महाराष्‍ट्रातील असंख्‍य रसिकांना हास्‍यानुभव देऊन गेला.

            जी. ए. कुलकर्णी, पु.ल. देशपांडे,गो. नी. दांडेकर, पु.भा. भावे, जयवंत दळवी, व. पु. काळे हे त्‍यांचे आवडते लेखक तर कुसुमाग्रज, वा.रा. सोनार,उत्‍तम कोळगावकर हे आवडते कवी. व्‍यंगचित्रक्षेत्र गाजवल्‍यानंतर आज ते आनंदी जीवन जगत असले तरी शांत बसलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या मदतीने वास्‍तववादी चित्रे रेखाटून रसिकांना खुश करीत आहेत. संगणकाच्‍या मदतीने रेखाटलेल्‍या चित्रांचे प्रदर्शनही त्‍यांनी मुंबईला भरविले होते.

            सुप्रसिध्‍द चित्रकार दीनानाथ दलाल, मुळगावकर, एस.एम. पंडित यांच्‍यासह बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्‍या व्‍यंगचित्रांचेही ते चाहते आहेत. ‘मार्मिक’ आणि ‘शंकर्स विकली’मधील व्‍यंगचित्रे ते नेहमी पहात. पण त्‍यांनी कुणाचे अनुकरण केले नाही. प्रत्‍येकातील चांगले ते त्‍यांनी पारखून घेतले आणि आपली कलाकुसर पेश केली. रंगसंगती चमकदार होईल, शरीर-चित्रण देखणे होईल, वेशभूषा आकर्षक होईल,पार्श्‍वभूमी नयनरम्‍य होईल याचा सर्वंकष विचार त्‍यांनी व्‍यंगचित्रे रेखाटतांना केलेला दिसून येतो. त्‍यांचे व्‍यंगचित्र पहातांना एखाद्या चित्रपटातील दृश्‍याचे छायाचित्र आपण पहात आहोत की काय, असा भास रसिकांना होतो. श्रेष्‍ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्‍यासह श्याम जोशी,वसंत सरवटे, मंगेश तेंडुलकर, गवाणकर,शि. द. फडणीस, उद्धव ठाकरे यांच्‍याशी त्‍यांचा जवळून स्‍नेह आला. यातील व्‍यंगचित्रकारांकडे त्‍यांचे जाणे-येणे होते. पण त्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा अहंभाव नव्‍हता.

            नवोदित व्‍यंगचित्रकारांना ते ही कला समृध्‍द करण्‍याचे आवाहन करतात. दहा-बारा व्‍यंगचित्रे खरडली की झाला व्‍यंगचित्रकार, हा समज दूर होण्‍याची गरज ते प्रतिपादन करतात. व्‍यंगचित्रकाराला दैवी देणगी लाभलेली असते. वाचन,निरीक्षण, कल्‍पनाशक्‍ती, रेखाटने,नावीन्‍यपूर्ण विषयांचा सातत्‍याने शोध या गुणांच्‍या आधारे आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन व्‍यंगचित्रकार जाहिरात,दूरचित्रवाणी, सोशल मिडीया, चित्रपट अशा माध्‍यमांमध्‍ये उत्‍तुंग झेप घेऊ शकतो,हेही  ते लक्षात आणून देतात.

            ज्ञानेश सोनार यांनी आपल्‍या बावनकशी व्‍यंगचित्रांनी रसिकांचे मनोरंजन करण्‍याबरोबरच वाहतूक सुरक्षा, पर्यावरण रक्षण, महिला सक्षमीकरण, अंधश्रध्‍दा निर्मूलन अशा विविध विषयांवर वाचकांचे प्रबोधनही केले आहे. रसिकांच्‍या हशा आणि टाळ्यांनी त्‍यांनाही समाधान दिले आहेच. जीवनगौरव पुरस्‍काराच्‍या निमित्‍ताने सोनार यांच्‍या शंभर नंबरी कार्याचा गौरव होत आहे. सोनार सरांचे भावी आयुष्‍य सुखी, समाधानी, आनंदी आणि आरोग्‍यसंपन्‍न जावो, हीच प्रार्थना.

राजेंद्र सरग 9423245456

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...