पुणे – करोनाच्या संकटामुळे गेल्या दीड – दोन वर्षापासून महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मात्र असे असले तरी पुणे महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांनी एकमताने घेतला. यंदाच्या वर्षी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के दिवाळी बोनस आणि १७ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे अशी माहिती सभागृहनेते गणेश बिडकर यांनी दिली .
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पक्षनेत्यांची बैठक झाली. सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ यांच्यासह इतर पक्षाचे गटनेते यावेळी उपस्थित होते. पुणे महानगपालिकेच्या कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान आणि वाढीव रक्कम द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार या बैठकीत बोनस, सानुग्रह अनुदान देण्याबरोबरच वाढीव तीन हजार रुपये देण्यास मान्यता देण्यात आली.
पुढील पाच वर्षासाठी कामगार संघटनेबरोबर हा करार करण्यात येणार आहे. पाच उपसूचना देऊन हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. पहिल्या वर्षी १७ हजार रुपये त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी दोन हजार रुपयांची वाढ या प्रमाणे १९ हजार, २१ हजार, २३ हजार आणि २५ हजार रुपये अनुदान म्हणून दिले जाणार आहे. दिवाळी पूर्वी दोन आठवडे मान्यताप्राप्त संघटनेबरोबर याचा करार करण्यात येणार आहे. करोनाच्या काळामध्ये बालवाडी शिक्षिका सेवक यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांनाही पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्ण बोनस दिला जाणार आहे. सर्व शिक्षा अभियानामध्ये काम करणाऱ्या एकूण ६६ कर्मचाऱ्यांना तसेच विशेष बाब म्हणून शिक्षण विभाग (प्राथमिक) कडील ९६ शिपाई (रोजंदारी) सेवकांना यंदाच्या वर्षी करोना काळातील कामकाजामुळे १७४ दिवस भरत असल्याने त्यांना देखील सानुग्रह अनुदानाचे फायदे दिले जाणार आहेत. करोनाच्या काळात पालिकेतील कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल बोनस व सानुग्रह अनुदाना व्यतिरिक्त बक्षीस म्हणून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
पालिकेतील कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस तसेच सानुग्रह अनुदान देण्याचा करार कामगार संघटनेबरोबर करण्यास मान्यता देण्यात आली. सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. पुढील पाच वर्षासाठी हा करार असणार आहे.
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महानगरपालिका
करोनाचे संकटामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी करोनाच्या काळात कर्मचारी, अधिकारी यांनी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडले. या सर्वांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी बोनस, अनुदान व्यतिरिक्त तीन हजार रुपये बक्षिस म्हणून दिले जाणार आहेत. सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी देखील पुढील महिन्यापासूनच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेश बिडकर, सभागृह नेते, पुणे महानगरपालिका
पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदान आणि बोनस देण्यास एकमताने मान्यता दिल्याने सर्व पक्षाचे संघटतेच्या वतीने आभार मानतो. यापुढील काळात कर्मचारी अधिक चांगल्या प्रकारे आपले काम करण्यास कटिबद्ध असतील.
उदय भट, अध्यक्ष, पुणे महानगरपालिका कर्मचारी संघटना

