सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जिल्हाधिकारी एका तरुणाचा मोबाईल रस्त्यावर आदळून फोडताना दिसत आहेत. इतकंच नाही तर यानंतर त्यांनी तरुणाला चापटही मारली एवढं करुनही समाधान न झाल्यानं त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यालाही या युवकाला मारण्यास सांगितलं. हा व्हिडिओ छत्तीसगडच्या सूरजपुर जिल्ह्यातील आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव रणवीर शर्मा असं आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संबंधित कलेक्टरच्या या कृत्याची मोठ्या प्रमाणात निंदा केली जात आहे. यानंतर कलेक्टरनं याप्रकरणावर सफाई देत आपला व्हिडिओ शेअर केला आहे.
ही घटना सूरजपूरमधील भैयाथान चौकातील आहे. जिल्ह्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. या लॉकडाऊन पालन होतंय का हे पाहाण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी स्वतः रस्त्यावर फिरताना दिसले. मात्र, सामान्य लोकांना लॉकडाऊनचं पालन करण्याचं शिकवत असताना ते स्वतःच माणुसकीचा धडा विसरुन गेले आणि त्यांनी दादागिरी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी महिलांनाही चुकीची वागणूक दिली. तर, काहींना रस्त्यावरच उठाबशा काढण्यास सांगितलं. याचवेळी त्यांनी आपल्या वडिलांसाठी औषधं घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला काठीनं मार दिला.
जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या दादागिरीच्या नादात युवकाचा फोन रस्त्यावर आदळत फोडूनही टाकला. इतकंच नाही तर पोलिसांना त्याला मारहाण करण्यासह सांगितलं. यादरम्यान रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक लोकांनी बाहेर पडण्याचं कारण सांगूनही त्यांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या लोकांनाही सोडलं नाही, या कारवाईत एका तेरा वर्षाच्या मुलासह अनेकांनी दुखापती झाल्या आहेत. यानंतर स्थानिक लोकांनी याविरोधात आवाज उठवला.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी रणवीर शर्मा चांगलेच ट्रोल झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांना काढून टाकण्याच्या मागणीसाठी अनेक हॅशटॅग चालवले जात आहेत. यानंतर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची माहिती देत माफी मागितली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी म्हणाले, की ज्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो युवक लस घेण्यासाठी जात असल्याचं सांगत होता. मात्र, त्याच्याकडे त्याबाबतचा योग्य पुरावा नव्हता. नंतर त्यानं म्हटलं, की तो आजीच्या घरी निघाला आहे. त्याच्या चुकीच्या वागणुकीमुळे मी त्याला चापट मारली. कलेक्टर असंही म्हणाले, की त्याचं वय 23-24 वर्ष होतं. 13 वर्ष नाही. मात्र, या कृत्यासाठी मी माफी मागतो, असंही ते म्हणाले.

