आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना भेट !
पुणे-
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना नवं बळ दिले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त समाजपयोगी उपक्रमाचा क्रम कायम राखत, रिक्षाचालकांना १००० रुपयांच्या सीएनजी गॅसच्या कुपन्सचे वाटप केले असून, जवळपास २००० जणांनी याचा लाभ घेतला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील दरवर्षी आपला वाढदिवस पारंपरिक पद्धतीने साजरा न करता, अतिशय अभिनव पद्धतीने आणि समाजपयोगी उपक्रमाद्वारे साजरा करतात. गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मामीटर, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या काढा आदींचे वाटप केले होते.
यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार-तुरे नको, वंचितांसाठी लस आणि रिक्षावाले काकांसाठी सीएनजी कुपन भेट देण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयात कोथरूडमधील रिक्षाचालकांना १००० चे सीएनजी कुपन्सचे वाटप करण्यात आले. याचा लाभ जवळपास २००० रिक्षाचालकांना घेतला. उद्यापासून त्या सर्व कुपनधारकांना पौंड रोड येथील साई पेट्रोल पंप येथून सीएनजी गॅस मिळणार आहे.
दरम्यान, काल दिनांक ८ जून रोजी वंचितांच्या लसीकरणासाठी कुपन वाटप करण्यात आले. याला ही कोथरूडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले नावनोंदणी केले. यानंतर जवळपास १३०० जणांना लसीकरणासाठी कुपन देण्यात आले. त्या सर्वांचे दिनांक १० आणि ११ जून रोजी लसीकरण होणार आहे.

