अखिल मंडई मंडळाच्यावतीने 23 वा कृतज्ञता सन्मान सोहळा
पुणे : पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील सर्वाधिक विद्यापिठे पुण्यात आहेत. त्यापैकी मंडई विद्यापीठ महत्त्वाचे आहे. सामाजिक भान जपण्याचे शिक्षण या मंडई विद्यापीठात मिळते. गणेशोत्सव मंडळांमुळे कोरोनासारख्या आपत्तीतून बाहेर येण्यास खूप मोठी मदत झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे आपत्ती निवारण व्यासपीठ निर्माण व्हावे, आणि या व्यासपीठाचे नेतृत्व सामाजिक भान जपणाऱ्या अखिल मंडई मंडळाने करावे, असे मत ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळाच्या वतीने मंडळाच्या समाजमंदिरात आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, रोटरी क्लब ऑफ हेरीटेजचे अध्यक्ष विनायक पेठे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सुरज थोरात, विक्रम खन्ना, संकेत मते, अजय झवेरी, संकेत तापकीर, साहिल मिसाळ, अथर्व माने, ओमकार थोरात उपस्थित होते. सन्मानपत्र, शाल आणि मिठाई असे सन्मानाचे स्वरुप होते. कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे यंदा 23 वे वर्ष होते.
अरुण खोरे म्हणाले, कोरोना काळात गणेशोत्सव मंडळांनी जो संयम दाखविला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. दरवर्षी अतिशय जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव सर्वच मंडळांनी साधेपणाने साजरा करुन ही मंडळे समाजाच्या प्रक्रीयेत सहभागी झाली आहेत. यापूर्वी देखील ज्या ज्या वेळी पुण्यावर अतिरेकी संकट आले, त्यावर मात करुन मंडळांनी एकात्मता जपली आहे, असेही त्यांनी सांगितले.
अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सवानंतर जे सफाई कामगार पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी राबतात, त्यांचा सन्मान करण्यासाठी कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. परंतु मागील २ वर्षे कोरोनाकाळात बॅंक कर्मचारी, औषध विक्रेते आणि पत्रकार बांधव युद्धपातळीवर काम करुन आपली सेवा देत होते. त्यामुळे त्यांचा सन्मान मंडळातर्फे करण्यात आला. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

