सिमेंटच्या रस्त्यामुळे पाणी तुंबलेले नाही-आयुक्त विक्रम कुमार यांचा दावा
पुणे : काल पुण्यात ढगफुटी झाल्याचा इन्कार हवामान खात्याने केला असून मुसळधार पाउस होता त्याचा अंदाज हि व्यक्त करण्यात आला होता मात्र हि ढगफुटी नव्हती असे हवामान खात्याने म्हटले असले तरी महापालिकेने मात्र हि ढगफुटी होती आणि अभूतपूर्व पाऊस होता जो १८८२ नंतर प्रथमच झाला असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान नाले, ओढे यांच्या जमिनी बळकावून त्यावर अनधिकृत बांधकामे करून केलेय राष्ट्रवादी च्या उद्योगाने पुणे बुडत असल्याचा आरोप भाजपाचे जगदीश मुळीक यांनी केलाय.
दरम्यान सोमवारी (दि. १७) रात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शहरातील जलमय भागातील विस्कळीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र रास्तापेठ विभाग अंतर्गत एनआयबीएम परिसरातील पाच सोसायट्यांच्या तळमजल्यावर मीटर बाॅक्स व मीटर संच असलेल्या ठिकाणी अद्यापही पाणी साचलेले आहे. त्यामुळे वीजसुरक्षेला प्राधान्य देत संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. एनआयबीएम परिसरातील साईदर्शन, द लॅटीट्यूड, अर्चना कॅसल, ब्रम्हा मॅजेस्टिक व मनीष प्लाझा अशी या सोसायट्यांची नावे आहेत. या सोसायट्यांमधील साचलेले पाणी काढण्याचे काम सुरु आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतर वीजयंत्रणेची पाहणी करून रात्री उशिरा या सोसायट्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे. तोपर्यंत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे शहरात काल रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. सिमेंटच्या रस्त्यामुळे पाणी तुंबलेले नाही,कमी वेळात अभूतपूर्व पाऊस हेच कारण असल्याचा दावा विक्रमकुमार यांनी केलाय. हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पुणे शहरात दोन तासात १०५ मिमी इतका रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले.यावर पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, काल रात्री शहरात मुसळधार पाऊस झाला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी हानी व नुकसान झाले नाही.पुढे बोलताना विक्रम कुमार म्हणाले, पुणे शहरात काल रात्री १०.३० ते १२.३० या वेळेत १०५ मिमी एवढा पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे १८ वस्त्यांमध्ये पाणी शिरले. तसेच दोन ठिकाणी भिंती पडल्या. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. शहरातील ड्रेनेज लाईनची क्षमता ६० मिमी आहे. आणि काल त्यापेक्षा दुप्पट पाऊस झाल्यामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले. पुणे शहराला आज यलो अलर्ट देण्यात आला असून संध्याकाळी ६० मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.दरम्यान, १८८२ नंतर पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. आजपर्यंत ऑक्टोबर महिन्यात परतीचा २१० मिमी इतका पाऊस व्ह्यायचा.दरवर्षी पुणे शहरात साधारणतः ७०० मिमी पाऊस होतो. मात्र यावर्षी १००० मिमी इतका पाऊस झाला असल्याचेही विक्रम कुमार म्हणाले.
याविषयी अधिक माहिती देताना भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ.अनुपम कश्यापी म्हणाले, “माझ्या माहिती नुसार एवढ्या कमी कालावधीतला काल रात्री झालेला पाऊस मुसळधार आहे.मात्र ढगफुटी नाही.दिवसभर आकाश अंशतः ढगाळ अशी स्थिती आणि दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आणखी दोन दिवस अशी स्थिती कायम राहणार आहे.यामुळे पुढील दोन दिवस कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे.रेनकोट – छत्री सोबत बाळगावी, पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या दिनक्रमाचे नियोजन करावे, असेअनुपम कश्यपी म्हणाले.शहराचा पावसाचा इतिहास पाहता, दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये ऑक्टोबरमध्ये १४४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरच्या चार वर्षांमध्ये म्हणजे २०१६पर्यंत एकदाही ऑक्टोबर महिन्यात शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली नाही. पण यामध्ये २०१८ चा अपवाद वगळता दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हवामान खात्यात नोंदवला गेला. दरम्यान, दिवाळीपर्यंत हा पाऊस कमी होईल असा अंदाज अनुपम कश्यापी यांनी वर्तविला.

