पुणे : आजच्या घडीतील सर्वात मोठी समस्या बनलेल्या फेकन्यूजवर मात करण्यासाठी पत्रकारांनी सत्यनिष्ठा जपण्याबरोबरच ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनण्याची अपेक्षा ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केली.
विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय पत्रकार दिना”च्या निमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अरुण खोरे बोलत होते. यावेळी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
श्री. अरुण खोरे म्हणाले, आज माध्यमांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत, त्यामुळे माध्यमांसमोरील प्रश्न बदलले आहेत. माध्यमांनी आपला सामाजिक दृष्टिकोन जागा ठेवणे आवश्यक असून समाजातील वंचितांसाठी काम करणाऱ्यांची दखल घ्यावी. तसेच पत्रकारांनी ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करून त्याचे कायद्यात रुपांतर केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.
उपसंचालक मोहन राठोड म्हणाले, राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सामाजिक विषयावर देशभर मंथन होण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात येतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले. आभार माहिती सहायक संग्राम इंगळे यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे, तेजबहादूर सिंग पत्रकारांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.