राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना कार्यान्वयीत केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र उद्योग/व्यवसायांतर्गत प्रकल्प किंमत कमाल मर्यादा सेवा उद्योग तसेच कृषि पूरक उद्योग/व्यवसायांसाठी रु.10 लाख व उत्पादन प्रकाराच्या प्रवर्गातील प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत मर्यादा रु.50 लाख इतकी आहे. तसेच अनुदान मर्यादा ही क्षेत्र व प्रवर्ग निहाय बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या 15 टक्के ते 35 टक्के पर्यत आहे. या योजनेचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहे.
- वयोमर्यादा – कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी असलेले वय 18 वर्षे पूर्ण व
अधिकतम मर्यादा 45 वर्षे तसेच विशेष प्रवर्ग -अनुसुचित जाती/जमाती/महिला/ अपंग/
माजी सैनिक यांचे साठी 5 वर्षे शिथिल.
- शैक्षणिक पात्रता – रु. 10 लाखावरील प्रकल्पासाठी इयत्ता 7 वी उत्तीर्ण व रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी
इयत्ता 10 वी उत्तीर्ण अशी आहे.
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ घेता येईल.अर्जदार व्यक्तीने यापूर्वी शासनाच्या अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. याप्रमाणे पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेअंतर्गत त्यांचे अर्ज maha-cmegp.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सादर करावेत.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे :- 1.जात प्रमाणपत्र(लागू असल्यास), 2. शैक्षणिक प्रमाणपत्र 3. डोमासाईल प्रमाणपत्र/जन्मदाखला 4.प्रकल्प अहवाल,5.आधारकार्ड,6.पॅनकार्ड 7.फोटो, 8.विशेष प्रवर्गासाठी संबंधित प्रमाणपत्र 9.विहीत नमुन्यातील अंडरटेकींग इ. कागदपत्रे स्कॅन करुन पीडीएफ फाईल अपलोड करावे.
योजना ही सुशिक्षित बेरोजगारांसाठी सहाय्यकारी ठरणार असल्याने व त्यामाध्यमातून रोजगारही उपलब्ध होणार असल्याने सदर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा.
- अधिक माहितीसाठी:–
जिल्हा उद्येाग केंद्र,शेतकी कॉलेज आवार, शिवाजीनगर, पुणे कार्यालयाकडे संपर्क करावा.
-विशाल कार्लेकर
सर्वसाधारण सहायक
जिल्हा माहिती कार्यालय,पुणे