मुंबई : ‘नमामि चंद्रभागा अभियाना’च्या www.namamichandrabhage.org या संकेतस्थळाचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अभियानात सहभागी होऊन उपक्रमाची माहिती घेणे, उपक्रमाबद्दलचे आपले मत नोंदवणे, सूचना आणि विचारांचे आदानप्रदान करणे या संकेतस्थळाच्या माध्यमातून शक्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पणन मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नमामि गंगेच्या धर्तीवर ‘नमामि चंद्रभागे’ अभियान राज्य अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले होते. राज्यातील जनतेला या कार्यक्रमात सहभागी होता यावे, या कार्यक्रमात व्यापक लोकसहभाग मिळावा व सर्वांच्या प्रयत्नातून हे कार्य यशस्वीरित्या पूर्णत्वाला जावे, हा उद्देश या संकेतस्थळाच्या माध्यमातून पूर्णत्वाला जाऊ शकेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पंढरपूरची चंद्रभागा नदी ही महाराष्ट्राच्या निखळ श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे नाते अतूट असल्याने चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मळतेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. हे लक्षात घेऊनच राज्याच्या अर्थसंकल्पात ‘नमामि चंद्रभागे अभियान’ घोषित करण्यात आले होते. त्यानंतर दि. १ जून २०१६ रोजी पंढरपूर येथे नमामि चंद्रभागा परिषदेचे आयोजन झाले, यावेळी नमामि चंद्रभागा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. याचेच एक पुढचे पाऊल म्हणून आज या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळावर चंद्रभागा नदीच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या कामाबरोबरच अभियानाची सर्व माहिती देण्यात आली आहे. यातील ‘आमच्या विषयी’ या सदरामधून पंढरपूरचे मंदिर, त्याचा इतिहास व वैशिष्ट्ये यांची माहिती देण्यात आली आहे तर वारकरी संप्रदायाची उल्लेखनीय माहिती ‘वारकरी प्रथा’ या सदरात आहेत. महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभली आहे. या संतपरंपरेची ओळख ‘संतांची माहिती’ या सदरातून आपल्याला वाचायला भेटेल. यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, मुक्ताबाई संत एकनाथ यासारख्या संतांची माहिती व कार्य देण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तसेच यासंबंधीच्या कामाची माहिती देणाऱ्या बातम्या, लेख मीडिया सदरात देण्यात आले आहेत. तर सर्वात महत्त्वाचे असे ‘सहभागी व्हा’ हे सदर असून या सदरात राज्यातील जनतेला या उपक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवता येणार आहेत, आपल्या सूचना देता येणार आहेत.