मुंबई : महाड येथील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा हा पूल महाडपासून दक्षिणेस असून 1928 साली बांधला गेला होता, मात्र त्या पुलाचे आयुष्य संपले असल्याचे ब्रिटनमधील कंपनीने कळविल्याची बाब सत्य नाही. दुर्घटनेची माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी आणि पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हवाईदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर तसेच एनडीआएफच्या चार तुकड्या, नऊ बोटी आणि ट्रेलर्स मदतकार्यात गुंतले आहेत. तसेच 35 स्थानिक पोहणारे आणि 7 राफ्टर्स टीमही कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून 1077 या टोल फ्री क्रमांकावर मदतकार्याबाबत समन्वय निर्माण करण्यात येत आहे. बेपत्ता व्यक्तींचा सखोल शोध घेण्यात येत आहे.
दुर्घटनेत जयगड – मुंबई (एमएच 20 बीएन 1538), राजापूर – बोरिवली (एमएच 40 एन 9739) या दोन एसटी बसेससह तवेरा (एमएच 07 एच 7837) आणि होंडा सिटी या वाहनांचा समावेश आहे. दोन बसेसमध्ये 26 प्रवासी आणि तवेरामध्ये 8 व होंडा सिटीमध्ये 4 आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील माहितीनुसार 4 प्रवासी असे एकूण 42 प्रवासी बेपत्ता झाले आहेत. मी स्वत: घटनास्थळास भेट दिली असून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाड व परिसरात गेल्या 24 तासात सुमारे 222 मीमी पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. बेपत्ता प्रवाशांपैकी 8 मृतदेह प्राप्त झाले आहेत. शोधण्यात आलेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी रुग्णवाहिकेची सेवा तात्काळ सुरू करण्यात आली आहे. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांसाठी बुटाला सभागृह, महाड येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. सदर ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून रत्नागिरीकडून मुंबईकडे येणारी वाहतूक पोलादपूरकडून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक माणगावमार्गे वळविलेली आहे. घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, हे यापूर्वीच सांगितले आहे. तसेच राज्यातील सर्व जुन्या ब्रिटीशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट शक्य तितक्या लवकर सुरू करण्यात येईल, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
याविषयावर विधानपरिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली.